भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : रक्षाबंधन किंवा लग्नसमारंभात बहिणीला सोने-चांदी अथवा रोख रक्कम देण्याऐवजी, तिच्या हातात ‘गौ-लक्ष्मी’ अर्थात गाय देण्याची परंपरा पुन्हा रुजावी, या उद्देशाने पोहरादेवी येथे वसूबारसच्या दिवशी १००१ गायींचे दान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य तथा पोहरादेवीचे पिठाधीश महंत बाबूसिंगजी महाराज यांनी हा संकल्प जाहीर केला असून, या उपक्रमातून धार्मिक श्रद्धेसोबतच गोसंवर्धन, नैसर्गिक शेती आणि कौटुंबिक संस्कारांचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.
येत्या ५ नोव्हेंबर रोजी गोवत्स द्वादशी अर्थात वसूबारस असून, याच दिवशी पोहरादेवी येथे हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. भावाने बहिणीला प्रेमाची आणि जबाबदारीची निशाणी म्हणून गाय दान करावी, तसेच तिच्या संगोपनातून कुटुंबात दुध-दुभत्याची परंपरा टिकावी, हा या संकल्पामागील मुख्य हेतू असल्याचे महंत बाबूसिंगजी महाराज यांनी सांगितले.
यांत्रिकीकरणामुळे गो-धनाची घट
एकेकाळी गावागावांत पोळ्याच्या सणाला शेकडो बैलजोड्या पाहायला मिळत होत्या. मात्र शेतीचे यांत्रिकीकरण झाल्याने बैलांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यातच बदलती जीवनशैली, शिक्षणाकडे वाढलेला कल आणि गुरांच्या संगोपनासाठी उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता यामुळे गो-धनाचे पालनही कमी झाले आहे.
परिणामी गायी-बैलांची संख्या घटत असून, पशुधन संवर्धनाचा प्रश्न गंभीर होत आहे. दुसरीकडे रासायनिक शेती आणि पारंपरिक दुध-दुभत्याच्या व्यवस्थेपासून दूर जाण्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणासमोरही नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर गोसंवर्धनाला कौटुंबिक संस्कारांशी जोडण्याचा हा उपक्रम असल्याचे सांगण्यात आले.
‘दान’ केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक संस्कार
प्राचीन काळात मुलीच्या विवाहावेळी किंवा कुटुंबीय प्रसंगी गाय अथवा वासरू देण्याची प्रथा होती. त्या परंपरेला आधुनिक काळात नव्या स्वरूपात पुढे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.
भावाकडून मिळालेली गाय ही बहिणीसाठी केवळ संपत्ती नसून भावाच्या प्रेमाची आणि कुटुंबाच्या संस्कारांची निशाणी ठरावी, अशी संकल्पना यामागे आहे. तिचे संगोपन व्यवस्थित झाल्यास घरगुती दुग्धव्यवस्था वाढण्यासोबतच गो-धनाचे संवर्धन होण्यास मदत होईल.
दानासाठीही काही नियम
या उपक्रमात दान करण्यात येणारी गाय प्रजननक्षम आणि आरोग्यदृष्ट्या सुदृढ असणे अपेक्षित आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. तसेच गाय स्वमालकीची असल्याचे आणि ती स्वेच्छेने दान देत असल्याचे प्रतिज्ञापत्र दोन पंचांसमक्ष सादर करण्याची अट ठेवण्यात आली आहे. ज्या बहिणीकडे गायीच्या संगोपनाची योग्य व्यवस्था आहे, अशाच बहिणीला गाय दान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व समाजांनी सहभागी व्हावे
हा उपक्रम केवळ बंजारा समाजापुरता मर्यादित न ठेवता सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महंत बाबूसिंगजी महाराज यांनी केले आहे. गोसंवर्धन, पर्यावरणपूरक शेती, पशुधनाचे महत्त्व आणि भाऊ-बहीण नात्यातील संस्कार यांचा संदेश या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान, १००१ गायींच्या दानाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या उपक्रमाच्या नियोजनाबाबत अमरावती येथे बंजारा समाजाच्या चालीरीती व पूर्वकालीन जीवनपद्धतीचे अभ्यासक प्राचार्य डॉ. अमरसिंग राठोड यांच्यासोबत महंत बाबूसिंगजी महाराज यांनी चर्चा केली. अमरावती व बुलढाणा जिल्ह्यासह आर्णी तालुक्यातील उमरी ईजारा येथील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक उत्तमराव कनिरामजी जाधव यांच्यावर नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, इतर जिल्ह्यांतील नियोजन पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे.
‘बहिणीला सोनं देण्यापेक्षा गौ-लक्ष्मी द्या; संस्कार, गोसंवर्धन आणि समृद्धीची परंपरा जपा!’












Add Comment