Maharashtra • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

संकल्प; वाढदिवसाला नवीन ड्रेस नको बाबा, झाड लावूया!

चिमुकल्या प्रांजलीची अनोखी इच्छा ; वडिलांनी वडाचे झाड आणि ट्री गार्ड देत पूर्ण केला मुलीचा संकल्प

भारती महाराज महासूत्र न्यूज

उमरखेड : वाढदिवस म्हटला की नवीन कपडे, केक आणि भेटवस्तूंची हौस असते. मात्र, उमरखेड येथील श्री गुरुदेव गोरोबा विद्यामंदिरात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या चिमुकल्या प्रांजली नारायण शेळके हिने या परंपरेला वेगळे वळण देत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला आहे.

“बाबा, माझ्या वाढदिवसाला नवीन ड्रेस नको, त्याऐवजी आपण झाड लावूया!” अशी निरागस इच्छा प्रांजलीने वडिलांकडे व्यक्त केली. मुलीची ही पर्यावरणपूरक संकल्पना ऐकून वडील नारायण शेळके यांनीही तिच्या विचारांचे कौतुक केले. मुलीचा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी त्यांनी तिला वडाचे झाड आणि त्याच्या संरक्षणासाठी ट्रीगार्ड आणून दिले.

वाढदिवसाच्या आनंदात निसर्गाची भर घालणाऱ्या प्रांजलीने केवळ झाड लावण्याचा विचार केला नाही, तर त्याचे संरक्षण व्हावे, याचीही काळजी घेतली. झाड लावणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्याचे संगोपन करणेही आवश्यक आहे. वडिलांनी ट्रीगार्डची व्यवस्था करून तिच्या संकल्पाला कृतीची जोड दिली.

आजच्या काळात वाढदिवसानिमित्त महागड्या भेटवस्तूंची अपेक्षा केली जात असताना, एका चिमुकल्या मुलीने नवीन ड्रेसऐवजी झाडाची मागणी करणे ही निसर्गाप्रती असलेल्या तिच्या संवेदनशीलतेची जाणीव करून देणारी बाब आहे.

एका झाडाच्या रूपाने वाढदिवसाची आठवण जपणाऱ्या प्रांजलीचा हा उपक्रम इतर मुलांसाठीही प्रेरणादायी आहे. वाढदिवसाला अनावश्यक खर्च करण्याऐवजी एक झाड लावा, त्याचे संरक्षण करा आणि निसर्गाच्या संवर्धनात आपले योगदान द्या, असा सुंदर संदेश प्रांजली आणि तिचे वडील नारायण शेळके यांच्या कृतीतून समाजापर्यंत पोहोचत आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.