भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी, उमरखेड तालुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना १ लाखाची सरसकट मदत करावी. ओलिताखालील शेतकऱ्याला २ लाखाची सरसकट मदत करावी. मजुरदार वर्गाला कामे लागणार नसल्याने, ५o हजार रुपये सानुग्रह मदत द्यावी. यासह थकीत व चालू पिक विमा देण्यात यावा. तसेच २०१९ पासूनच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. अशा विविध मागण्या, उमरखेड दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री बावनकुळे यांना, काँग्रेस शिष्टमंडळाकडून निवेदन देऊन करण्यात आल्या.
स्थानिक राजस्थानी भवनात, २८ सप्टेंबरला दुष्काळ आढावा घेण्यासाठी आलेल्या राज्याच्या महसूल मंत्री बावनकुळे यांना, काँग्रेस शिस्टमंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात ४० ते ४५ टक्केच असा अत्यल्प झालेल्या पावसाने, शेतकऱ्यांचे पुन्हा कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राज्य सरकार कडून मोठ्या प्रमाणात मदतीची अपेक्षा आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देण्यात आलेल्या निवेदनात, कोरडवाहू शेतकऱ्यांना पेरणीनुसार सरसकट १ लाखाची मदत द्यावी. ओलिताखालील शेतकऱ्याला पेरणीनुसार सरसकट २ लाखाची मदत करावी. कोरड्या दुष्काळामुळे मजुरांवरही उपासमारीची पाळी आली, त्यामुळे मजुरांनाही ५० हजार रुपये सानुग्रह निधी द्यावा. मजुरांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून द्यावी. यासह गतवर्षीचा व चालू विमा लाभ तात्काळ मिळून देण्यात यावा. मागील तीनही कर्जमाफीतील सुटलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा. पैनगंगा नदीपात्रात महिनेवारी पिण्यासाठी व जनावरांना पाणी सोडण्यात यावे. पैनगंगा अभयारण्यात येणाऱ्या गावांची रस्ते व्यवस्था दुरुस्त करावी व प्रलंबित वनपट्ट्याचा विषय निकाली काढावा. तसेच अभयारण्यातील १४ ही गावांना सुरक्षा रक्षक जाळी उभारून हिंस्र जनावरांपासून सुरक्षा द्यावी. अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तर काँग्रेसकडून देण्यात आलेल्या दुसऱ्या निवेदनात, उमरखेडमध्ये 26 सप्टेंबर रोजी ढाणकीरोड परिसरात झालेल्या जिलेटिन स्फोटामध्ये, मृत्युमुखी पडलेल्यांच्या चौघांच्याही वारसांना, प्रत्येकी दहा लाख रुपयाची मदत करावी. या घटनेतील जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत, तत्काळ आपत्ती व्यवस्थापन मधून करावी. तसेच घडलेल्या जिलेटिन स्फोट घटनेचा, सविस्तर तपास करून, दोशींवर कार्यवाही करावी. अशा मागण्या काँग्रेस शिष्ट मंडळाकडून, महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे, दुसऱ्या निवेदनातून करण्यात आल्या.
यावेळी काँग्रेसचे नेते नंदकिशोर अग्रवाल, माजी तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, खाजाभाई कुरेशी, उत्तमराव पांडे, सुधाकर लाहेवार, अनिल कदम, अतुल पाटील, सिद्धेश्वर जगताप, जुबेर कुरेशी, प्रकाश शिकारे, रसूल पटेल, वासिफ पठाण, गणी शहा, सोनू खतीब, रियाज खान, शेख अझहर, मधुकर फटिंग, गजानन भारती, विकार खतीब, बाबू हिना, देवा इंगोले आदि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












Add Comment