Front • india • Maharashtra • Maharashtra crimes • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

उमरखेड स्फोट प्रकरण: “जिलेटिन स्फोटाचा तपास ढाणकीपर्यंत, पुरवठादार अटकेत, पाच दिवसांची पोलीस कोठडी”

भारती महाराज महासूत्र न्यूज

उमरखेड : पुसद–हरदडा राज्य मार्गावरील ढाणकी रोड परिसरात २६ सप्टेंबर रोजी झालेल्या शक्तिशाली जिलेटिन स्फोटात, आत्तापर्यंत चौघांचा ‘बळी’ गेला तर १० जण गंभीर व किरकोळ जखमी झाले होते. दरम्यान तपास सुरू झाल्यानंतर मात्र या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गंभीर जखमी ट्रॅक्टर मालकाच्या जबाबावरून, पोलिसांनी ढाणकी येथील जिलेटिन पुरवठादार बळीराम नरवाडे याला शनिवारी उशिरा रात्री अटक केली असून, न्यायालयाने त्याला १ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

या प्रकरणात ट्रॅक्टर मालक आप्पाराव माधव बोक्से (५५), मृत ट्रॅक्टर चालक वैभव आप्पाराव बोक्से (२०), दोघेही रा. बाळदी, ता. उमरखेड, तसेच जिलेटिन पुरवठादार बळीराम नरवाडे (५०), रा. ढाणकी, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी किरण जगराम राठोड (३२) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

जखमी ट्रॅक्टर मालकाच्या जबाबाने तपासाला दिशा

स्फोटाच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत, गंभीर जखमी ट्रॅक्टर मालक आप्पाराव बोक्से यांचा जबाब नोंदविला. पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोटात वापरलेले जिलेटिन ढाणकी येथील बळीराम नरवाडे यांच्याकडून घेतल्याचे, त्यांच्या जबाबातून समोर आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नरवाडे यांना ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईनंतर अटक करण्यात आली.

 

 

विनापरवाना स्फोटक बाळगल्याचा आरोप!

तपासात ट्रॅक्टर मालक व चालकाकडे स्फोटक पदार्थ बाळगणे अथवा वापरण्याचा वैध परवाना, नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे पिता-पुत्राला या प्रकरणात आरोपी करण्यात आले. तर परवानाधारक नसलेल्या व्यक्तीला जिलेटिन पुरवल्याचा आरोप, पुरवठादारावर ठेवण्यात आला आहे.

 

 

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम १०५, २८८, स्फोटक पदार्थ (द्रव्य) अधिनियम १९८४ मधील कलम ९(१)(ब) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ मधील कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक तथा उमरखेड एसडीपीओ गौरव कायंदे पाटील करीत आहेत.

 

 

तपासाच्या कक्षा विस्तारण्याची शक्यता

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिलेटिनचा पुरवठा नेमका, अधिकृत गोडाऊन वरून झाला की इतर ठिकाणाहून झाला. त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का. तसेच संबंधित पुरवठादारा कडून यापूर्वीही विनापरवाना किंवा नियमबाह्य पद्धतीने स्फोटक पदार्थ पुरविले गेले होते का. अशा प्रकारे आजपर्यंत कोण कोणत्या अवैध ट्रॅक्टर मालकांना, स्फोटकांचा पुरवठा करण्यात आला. हे रॅकेट उमरखेड तालुक्यापुरतेच मर्यादित आहे, की बाहेर पण अस्तित्वात आहे, या सर्व बाबींचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. विशेषतः परवाना नसलेल्या व्यक्तीपर्यंत जिलेटिन कसे पोहोचले, त्याची खरेदी कुठून झाली, पुरवठ्याची साखळी किती मोठी आहे आणि यापूर्वी अशा प्रकारे स्फोटकांचा वापर झाला आहे का, या प्रश्नांची उत्तरे आरोपीच्या चौकशीतून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासाच्या कक्षा ढाणकीपुरत्या मर्यादित न राहता, पुढे विस्तारण्याची शक्यता आहे.

 

आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आलेल्या बळीराम नरवाडे यांना रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पोलीस चौकशीतून जिलेटिनच्या खरेदी-विक्रीची साखळी आणि स्फोटक पुरवठ्यामागील संभाव्य संबंध उघड होतात का, याकडे लक्ष लागले आहे.

 

स्फोटकांचा अहवाल अद्याप समोर नाही!

घटनेच्या दिवशी ब्लास्टींगचे स्वराज ट्रॅक्टर क्रमांक एमएच २९ व्हि २५२८ उभे होते. ट्रॅक्टरच्या आजुबाजुस पांढ-या रंगाच्या टयुब ज्यावर Super Power 90 (Emulsion Explosives) SOLAR असे लिहीलेले, अंदाजे  40 ते 50 टयुब अर्धवट फुटलेल्या अवस्थेत विखुरलेले तसेच त्याच ठिकाणी एक मोठे लाल रंगाच्या काॅर्टेज वायरचे  (वात) बंडल होते. ह्या सर्व संशयित बाबी यंत्रणांनी ताब्यात जरूर घेतल्या आहेत. मात्र या स्फोटातील जिलेटीन स्फोटकाचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप तरी समोर आला नसून, अहवाल समोर आल्यावर आणखी स्थिती स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

 

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.