भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देताना उमरखेड तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील मौजे बारा येथे घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करताना, पैनगंगा नदीपात्रात बुडून एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. तर यावेळी पडलेल्या तिघांना वाचविण्यात, गावकऱ्यांना यश आले.
हरीश पुंडलिक हरणे (१७) रा बारा ता उमरखेड असे मृत पावलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. या दुर्घटनेदरम्यान स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे इतर ३ जणांना सुखरूप वाचविण्यात यश आले आहे. माहितीनुसार, अनंत चतुर्दशी निमित्त मौजे बारा येथील काही तरुण घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी पैनगंगा नदीपात्रात गेले होते. गणेशमूर्तीचे विसर्जन करत असताना अचानक एका तरुणांचा पाय घसरून नदीमध्ये तोल गेल्याने, इतर काही मुले त्यासोबत खेचल्या गेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नदी किनाऱ्यावर एकच गोंधळ उडाला.
३ जणांना जीवदान, हरीश वाहून गेला
तरुण पाण्यात पडल्याचे पाहताच, सोबत असलेल्या नागरिकांनी आणि स्थानिक मोठ्या तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उड्या घेतल्या. त्यांनी तत्परता दाखवत पाण्यात बुडत असलेल्या ३ तरुणांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले. मात्र, हरीशचा थांगपत्ता काही लागलाच नाही.
एनडीआरएफ पथकाला पाचारण, मृतदेह बाहेर!
घटनेची माहिती तत्काळ उमरखेड पोलिसांना देण्यात आली. स्थानिक प्रशासनाने सूत्र हलवित, एनडीआरएफचे (NDRF) पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर वाहून गेलेल्या हरीशचा मृतदेह, दुसऱ्यादिवशी नदीपात्रातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. गणेश विसर्जनाच्या उत्साहावर या दुर्घटनेने विरजण पडले असून हरीशच्या मृत्यूची वार्ता गावात पोहोचताच बारा गावावर शोककळा पसरली आहे.












Add Comment