Maharashtra • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

जिल्हाधिकाऱ्यांनी गंगनमाळला बक्षीस दिलेल्या ६ लाखांचा हिशोब गायब; ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत गंगनमाळला दुसरा क्रमांक, माहिती अधिकारातून उघड, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!

भारती महाराज

महासूत्र न्यूज यवतमाळ (उमरखेड) : तालुक्यातील गंगनमाळ गावाला ‘सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन’च्या जलसंधारण स्पर्धेत २०१९-२० दरम्यान, दुसरा क्रमांक मिळाला होता. ज्यातून तब्बल सहा लाख रुपये बक्षिस जनुणा-गंगनमाळ या गट ग्रामपंचायतला मिळाले होते. विशेष म्हणजे हा ६ लाखाचा धनादेश खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच सुपूर्द केला होता. सदर रक्कम फक्त पाण्यासाठीच खर्च करणे बंधनकारक होते. मात्र मोठी गंमत म्हणजे, सदर ६ लक्ष रूपये ही रक्कम कशी व केव्हा खर्च झाली याचा लेखाजोखा ग्रामपंच्यातच्या कोणत्याच अभिलेखात उपलब्ध नसल्याची, खळबळजनक माहिती तक्रारदारास सध्याच्या ग्रामसेवकडून मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

साहजिकच, बक्षिसाची रक्कम  नेमकी गायब कशी झाली असा खमका प्रश्न, गावकऱ्यांना पडला आहे. ग्रामपंचायतीला धनादेश मिळाल्याचा उल्लेख असताना,  संबंधित रकमेची नोंदच अभिलेखात आढळत नसल्याचे सत्य, माहिती अधिकारातून समोर आले आहे. त्यामुळे गावाच्या विकासासाठी मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा विनियोग नेमका कसा झाला, हा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांकडे धूळखात पडल्याने गावकऱ्यांचा रोष वाढत असल्याचा आरोप, तक्रारदाराचा आहे. गंगनमाळ येथील एका तक्रारदाराने, २७ ऑक्टोबरला  यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

 

१५ जानेवारी २०२० रोजी सहा लाखांचा धनादेश?

तक्रारीनुसार, गट ग्रामपंचायत जुनुना (गंगनमाळ) अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ ने ‘सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन’च्या जलसंधारण स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उमरखेड तालुक्यातून दुसरा क्रमांक मिळाल्याने गावाला सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले होते. विशेष म्हणजे, १५ जानेवारी २०२० रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला सहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

 

गावाच्या जलसंधारण आणि विकासासाठी मिळालेल्या या रकमेचा विनियोग पारदर्शकपणे होणे अपेक्षित होते. मात्र, तत्कालीन सरपंच आणि ग्रामसचिव यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता या निधीचा अन्यत्र वापर केल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे.

 

माहिती अधिकारात रकमेची नोंदच आढळली नाही?

या कथित आर्थिक अनियमिततेचा मागोवा घेण्यासाठी बबन वाहुळे यांनी २ जुलै २०२६ रोजी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत माहिती मागवली होती. त्यानंतर ९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रथम अपील प्राधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. यावेळी अभिलेखांची तपासणी करण्यात आली असता संबंधित सहा लाख रुपयांच्या बक्षिसाची नोंद उपलब्ध अभिलेखात आढळली नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

 

एकीकडे ग्रामपंचायतीला सहा लाखांचा धनादेश दिल्याचा उल्लेख आणि दुसरीकडे अभिलेखात रकमेची नोंद नसल्याचा दावा, यामुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धनादेश प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाला होता का? जमा झाला असल्यास ही रक्कम कोणत्या कामासाठी आणि कोणाच्या परवानगीने खर्च करण्यात आली? खर्चाची नोंद रोखपुस्तकात का उपलब्ध नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

 

बँक व्यवहारांपासून खर्चाच्या नोंदीपर्यंत तपासणीची मागणी

या प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता संबंधित ग्रामपंचायतीचे बँक स्टेटमेंट, धनादेश जमा झाल्याची नोंद, रोखपुस्तक, आर्थिक व्यवहार आणि खर्चाची बिले तपासण्यात यावीत. सहा लाखांच्या बक्षिसाचा संपूर्ण आर्थिक हिशेब ग्रामस्थांसमोर आणावा. तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार?

गावाच्या जलसंधारणासाठी मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा नेमका विनियोग कुठे झाला, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. माहिती अधिकारातील अभिलेख आणि धनादेश वितरणाच्या दाव्यातील तफावत तपासून प्रशासन वस्तुस्थिती स्पष्ट करणार का? सहा लाखांच्या या बक्षिसाचा हिशेब अखेर उघड होणार का? याकडे गंगनमाळच्या ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

ग्रामसेवक म्हणतो मला काहीच माहित नाही, प्रकरण माझ्या कार्यकाळातीलच नाही !

या गंभीर प्रकाराबाबत जनुना-गंगाणमाळ ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी यांना विचारणा केली असता,त्यांनी सांगितले की, सदर प्रकरण माझ्या कार्यकाळातील नसून मी सदर ग्रामपंचायतीचा चार्ज घेण्यापूर्वीचे असल्याने मला याबाबत काहीच माहिती नाही. मात्र माहिती मागितल्या नुसार, संबंधित तक्रदारास माहिती पुरवल्या गेली असून, बक्षिसाच्या ६ लाखाच्या खर्चाचा कोणताही तपशील माझ्याकडे आलाच नसल्याने व रेकॉर्डवर नोंद नसल्याने त्याबाबत मला काही सांगता येणार नाही. अशी प्रतिक्रिया संबंधित ग्रामविकास अधिकारी  दत्ता मुंढे यांनी महासुत्रशी बोलतांना दिली.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.