india • Maharashtra • political party • Politics • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • महागाव • यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्हा बँकेवर महायुतीची मोहर; अध्यक्षपदी खासदार संजय देशमुख, तर नितीन भुतडा आणि विजय जाधव उपाध्यक्ष!

भारती महाराज महासूत्र न्यूज 

यवतमाळ : जिल्ह्याची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (YDCC) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार संजय देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळालेल्या दोन उपाध्यक्षपदांवर भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विजय जाधव यांची वर्णी लागली आहे. निवडणुकीनंतर आज पार पडलेल्या विशेष सभेत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

२६ वर्षांनंतर काँग्रेसच्या हातातील सत्ता हिसकावून घेत महायुतीच्या ‘बळीराजा सहकार पॅनेल’ने बँकेवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार तिन्ही पक्षांना समान न्याय देण्यात आला आहे.

 

 

अध्यक्षपदी खासदार संजय देशमुख: शिवसेनेची घोडदौड

 

दिग्रस तालुका गटातून बँकेवर अविरोध निवडून आलेले शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांच्या गळ्यात अखेर अध्यक्षपदाची माळ पडली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे मानाचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळाले आहे. खासदार संजय देशमुख यांच्या अनुभवाचा बँकेला फायदा होईल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

 भाजप-राष्ट्रवादीला समान वाटा

 

बँकेला मिळालेल्या दोन उपाध्यक्षपदांमुळे महायुतीतील इतर दोन घटक पक्षांचा सन्मान राखला गेला आहे. महागाव तालुका गटातून विजयी झालेले भाजपचे जिल्हा समन्वय नितीन भुतडा, यांना भाजप कोट्यातून उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तर, पुसद तालुका गटातून बिनविरोध निवडून आलेले, विजय जाधव यांची दुसऱ्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ६ पैकी ६ जागा जिंकून १००% स्ट्राईक रेट नोंदवला होता, त्याचे फळ जाधव यांना मिळाले आहे.

 

 

 

२५ वर्षांची सत्ता मोडीत, आता आव्हानांचा डोंगर

 

एकूण २५ जागांच्या या बँकेत महायुतीने १६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर महाविकास आघाडीला केवळ ९ जागा मिळाल्या होत्या. या नव्या संचालक मंडळासमोर आणि नवनियुक्त अध्यक्ष-उपाध्यक्षांसमोर बँकेची आर्थिक घडी बसवण्याचे मोठे आव्हान आहे. बँकेची तब्बल ५५० कोटी रुपयांची आर्थिक तूट भरून काढणे, वाढलेला एनपीए (NPA) कमी करणे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सुरळीत कर्जपुरवठा सुरू करणे याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

नवनियुक्त अध्यक्ष खासदार संजय देशमुख, उपाध्यक्ष नितीन भुतडा व विजय जाधव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.