भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : यवतमाळकरांच्या गळ्यातील ताईत आणि तब्बल ९० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेला प्रसिद्ध ‘बुढीचा चिवडा’ आता जागतिक पटलावर पोहोचला आहे. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळमध्ये तब्बल ३ हजार किलोपेक्षा जास्त वजनाचा चिवडा, एकाच वेळी तयार करून एक नवा अवाढव्य विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे.
“यवतमाळचा बुढीचा चिवडा – परंपरेची चव, एकतेचा विक्रम” या संकल्पनेवर आधारित हा भव्य सोहळा आज, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी यवतमाळ येथील दाते कॉलेज मैदानावर पार पडला. हा ऐतिहासिक चिवडा तयार करण्यासाठी अयोध्येत रामललाच्या महाप्रसादासाठी वापरण्यात आलेली विशाल ‘महाकढई’ खास यवतमाळात आणण्यात आली होती. ही भव्य कढई आणि त्यात तयार होणारा चिवडा पाहण्यासाठी, यवतमाळकरांनी मैदानावर अभूतपूर्व गर्दी केली होती.
९० वर्षांची चवदार परंपरा!
१९३६ मध्ये अंजनाबाई रामचंद्र भुजाडे यांनी आझाद मैदानावरून या चिवड्याची सुरुवात केली होती. सुरुवातीला अत्यंत कमी किमतीत मिळणारी ही चिवड्याची पुडी आज यवतमाळची मुख्य खाद्यसंस्कृती आणि ओळख बनली आहे. या पारंपरिक चवीला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठीच या महाविक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शेफ विष्णू मनोहर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा ३,००० किलोचा चिवडा तयार केला. हा उपक्रम यशस्वी होताच, उपस्थितांनी एकच जल्लोष केला. हा जागतिक विक्रम नोंदवला गेल्यानंतर हा महाप्रसाद म्हणून उपस्थित नागरिकांना आणि यवतमाळमधील विविध संस्थांना वाटण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.












Add Comment