Maharashtra crimes • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

अरे बाप रे… अधिकाऱ्यांच्या हजेरी मस्टरवर दुसऱ्या दिवसाच्याही अँडव्हान्स सह्या, आमदारांच्या पाहणीत अनियमितता उघड !

भारती महाराज महासूत्र न्यूज

 उमरखेड : शासकीय कार्यालयातील कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता असावी, अशी अपेक्षा असताना जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग क्रमांक २ मधील कर्मचाऱ्यांच्या, उपस्थितीच्या नोंदीतच गंभीर अनियमितता आढळल्याने खळबळ उडाली आहे. आमदार किसनराव वानखेडे यांनी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अचानक, कार्यालयाला भेट देऊन कर्मचारी मस्टर तपासले असता, काही कर्मचाऱ्यांनी चक्क दुसऱ्या दिवसाचीही आगाऊ स्वाक्षरी केल्याचे निदर्शनास आले. या प्रकारावर संताप व्यक्त करत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहे. मात्र हा प्रकार अतिशय गंभीर असून, आता या प्रकरणाची चौकशी होऊन, संबंधितांवर कार्यवाही होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

विशेष म्हणजे, आमदारांच्या या पाहणीत केवळ उपस्थितीचाच नव्हे, तर कार्यालयीन कामकाजातील जबाबदारीचाही प्रश्न ऐरणीवर आला. यापूर्वी शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने, आमदार वानखेडे यांनी विविध कार्यालयांना अचानक भेटी दिल्या. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात त्यांनी उपस्थित तीन शाखा अभियंत्यांकडून तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती घेतली.

 

यावेळी सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांबाबत अभियंत्यांना इस्टिमेटमधील तांत्रिक बाबी आणि कामाच्या दर्जासंबंधी अपेक्षित माहिती देता आली नाही. काँक्रीटचे प्रमाण, एम-१० डायरी, इस्टिमेट आणि प्रत्यक्ष कामातील तफावत याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे समोर आले. इस्टिमेटची प्रतही उपलब्ध करून देता न आल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

 

मात्र या पाहणीतील सर्वाधिक गंभीर बाब मस्टरवरील आगाऊ स्वाक्षऱ्यांची ठरली. कर्मचारी कार्यालयात उपस्थित आहेत की नाहीत, याची नोंद ठेवणाऱ्या मस्टरवरच दुसऱ्या दिवसाच्या सह्या आढळत असतील, तर कार्यालयीन शिस्त आणि प्रशासकीय नियंत्रण नेमके कोणाच्या हातात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

आमदार वानखेडे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देतानाच, भविष्यात अशा चुका झाल्यास सेवापुस्तिकेत नोंद घेण्याची सूचना केली. 

 

दरम्यान, अभियंत्यांनी केवळ कार्यालयात बसून कामकाज न करता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन इस्टिमेटनुसार काम सुरू आहे की नाही, याची खातरजमा करावी. कामाची कागदपत्रे सोबत ठेवावीत, क्युरिंगच्या कामाची तारीख आणि कालावधी नोंदवावा तसेच प्रत्येक कामाचे इस्टिमेट कार्यालयात उपलब्ध ठेवावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

 

आमदारांच्या या अचानक पाहणीमुळे बांधकाम विभागातील कामकाज, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि विकासकामांच्या गुणवत्तेचा प्रश्न चर्चेत आला आहे. आता संबंधित कर्मचाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता तपासली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

काम प्रामाणिकपणे करता येत नसेल तर, नोकऱ्या सोडा, असा सज्जड इशारा देत आमदार वानखेडे यांनी अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याचे अल्टिमेटम दिल्याची, खात्रीशीर माहिती आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.