भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : (दि. ११ सप्टेंबर) आभाळाकडे डोळे लागलेले… अन् शेतातील पिकांची चिंता… जनावरांसाठी पाण्याची काळजी… आणि या साऱ्या चिंतेतून पावसासाठी, उमरखेडच्या ईदगाह मैदानावर आज मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे साकडे घातले. दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याच्या पार्श्वभूमीवर, नमाज-ए-इस्तिस्का अदा करून पावसासाठी सामूहिक दुआ करण्यात आली. ही अतिशय संवेदनशील घटना, असंवेदनशीलतेचा ठपका बसलेल्या उमरखेड मधून समोर आली.
शुक्रवारी ११ सप्टेंबरच्या सकाळी, शहरातील विविध मशिदींचे इमाम तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव, शहरातील ईदगाह मैदानावर एकत्र जमली. ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण आणि लहान मुलांपर्यंत सर्वांनी नमाजमध्ये सहभाग घेतला. योग होता तो, नमाजीनंतर पाऊस न पडल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची चिंता दूर करण्यासाठी, सामूहिक प्रार्थनेचा. या ओढावलेल्या दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी, मुस्लिम समाज बांधवाळी सामूहिक नमाज-ए-इस्तिस्का अदा केली.
“या अल्लाह, आपल्या रहमतीचा पाऊस बरसव. कोरड्या पडलेल्या जमिनीला पुन्हा जिवंत कर आणि शेतकरी, जनावरे व सर्व नागरिकांवर आपली कृपा कर,” अशी भावपूर्ण दुआ यावेळी करण्यात आली.
विशेष म्हणजे ही माणुसकीची घटना, असंवेदनशीलतेचा ठपका बसलेल्या उमरखेडमधून समोर आली. पावसाअभावी शेती, पिके, जनावरे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. नमाज-ए-इस्तिस्का ही पावसासाठी अल्लाहकडे विनंती करण्याची विशेष नमाज मानली जाते. ईदगाहसारख्या मोकळ्या मैदानात ती सामूहिकरित्या अदा केली जाते. या घटनेचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.
पावसाची आस, सामूहिक प्रार्थनेतून व्यक्त झाली चिंता
उमरखेड परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना ईदगाह मैदानावर झालेली ही सामूहिक प्रार्थना केवळ धार्मिक विधी न राहता पावसासाठी आसुसलेल्या नागरिकांच्या भावनांना वाट करून देणारा क्षण ठरला. “उमरखेडसह संपूर्ण परिसरावर रहमतीचा पाऊस बरसव आणि सुख-समृद्धी प्रदान कर,” अशी सामूहिक दुआ करत उपस्थितांनी पावसासाठी अल्लाहकडे आर्त साकडे घातले.












Add Comment