महासूत्र न्यूज
उमरखेड : शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिघामध्ये, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर उमरखेड पोलिसांनी आज धडक कारवाई केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे, यांच्या कडक आदेशानुसार, राज्य शासनाचे विशेष परिपत्रक धडकले आहे. याच्याच अंमलबजावणी साठी, उमरखेड पोलिसांनी ही मोहीम राबवली. शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी, करण्यात आलेल्या या छापेमारीमुळे, नियमबाह्य गुटका व तस्सम तंबाखूजन्य विक्रेत्यांमध्ये, एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे.
शाळकरी विद्यार्थी आणि तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या, गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी , संपूर्ण राज्यात ‘कोटपा’ कायद्याची, कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच शासनाने जारी केलेल्या विशेष परिपत्रकानुसार, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
याच आदेशांचे पालन करत , उमरखेड पोलिसांनी शहरातील विविध शाळा-कॉलेजच्या परिसरात पाळत ठेवून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन ठिकाणच्या किरकोळ विक्रेत्यांवर, अचानक छापे टाकले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी संबंधित दुकानांमधील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला असून, तिन्ही किरकोळ विक्रेत्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला करण्यात येणार असल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे.
शासकीय परिपत्रक आणि एफडीए आयुक्तांच्या निर्देशानुसार, ही कारवाई करण्यात आली आहे. शाळकरी मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याची, गय केली जाणार नाही. ही मोहीम अशीच पुढेही सुरू राहील, असा इशारा उमरखेड पोलिसांनी दिला आहे. पोलिसांच्या या तडकाफडकी कारवाईचे , शहरातील नागरिक आणि पालकांनी मनापासून स्वागत केले आहे. सदर कार्यवाही उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात, सपोनी गांगलवाड, सपोनी लक्ष्मी मलकुलवार, जमादार प्रकाश बोंबले आदींनी केली आहे.












Add Comment