महासूत्र न्यूज
यवतमाळ : जिल्ह्यात सुरू असलेला सततचा मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी, जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी शाळा आणि महाविद्यालये आज, ३१ जुलै २०२६ रोजी बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत, जिल्हाधिकारी मीना यांच्या मान्यतेने, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी, हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये, खाजगी शाळांसह १ दिवसासाठी बंद राहतील. मात्र, आधीपासून नियोजित असलेल्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
३० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. मुंबई मंत्रालयातील नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजीही जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पूर परिस्थितीचा फटका, शालेय विद्यार्थ्यांना बसू नये, विद्यार्थी पुरात अडकू नयेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा खबरदारीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











Add Comment