महासूत्र न्यूज
यवतमाळ : शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव न आल्याने, आलेल्या तीव्र नैराश्यातून यवतमाळ जिल्ह्यातील भांब येथील एका शेतकऱ्याने, चक्क विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मात्र, पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा मुद्दा समोर आला असून, पिक विमा मिळाला नसलेल्या यवतमाळ जिल्हाभरातील शेतकऱ्यांची, चिंताजनक स्थिती समोर आली आहे.
राजू बापूराव चुड्डुके (४९) रा भांब, ता. राळेगाव जि यवतमाळ असे, विष प्राशन करून जीवन संपविलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू चुड्डुके यांच्यावर बँकेचे कर्ज होते. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ आपल्याला मिळेल, अशी मोठी आशा त्यांना होती. शनिवार, २५ जुलै रोजी राळेगाव येथील मध्यवर्ती बँकेत कर्जमाफीची नवीन यादी जाहीर झाली. ही यादी पाहण्यासाठी चुड्डुके बँकेत गेले होते. मात्र, संपूर्ण यादी तपासल्या नंतरही, त्यात आपले नाव नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
बँकेच्या जाचक अटींमुळे किंवा त्रुटींमुळे कर्जमाफीच्या यादीत नाव आले नसल्याचे समजताच ते प्रचंड मानसिक तणावाखाली आले. बँकेतून अत्यंत निराश होऊन ते घरी परतले. घरातील मुलाबाळांना फारसे बोलले नाही, पत्नीलाही काहीच सांगितले नाही, मात्र बँकेतून आल्या पासून ते अत्यंत तणावात असल्याचे कुटुंबियांना जाणवत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. याच नैराश्यातून त्यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी विष प्राशन केले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
जाचक अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष !
यवतमाळ जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्येचा दंश झेलत आहे. त्यातच शासनाच्या कर्जमाफी योजनांमधील क्लिष्ट अटी, तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे, अनेक गरजू आणि थकीत कर्जदार शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. राजू चुड्डुके यांच्या आत्महत्येने सरकारच्या कर्जमाफीच्या दाव्यांमधील फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला असून, दोषींवर कारवाईची मागणी स्थानिक शेतकऱ्यांमधून होत आहे.
पीकविमा नाकारल्याने शेतकरी अडचणीत
अगोदरच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा नाकारल्याने, शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आपल्या हक्काचा पैसा आपल्याच मिळत नसल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे मात्र सत्ता व शासन शेतकऱ्यांच्या रडारवर आला आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी यादीवरूनही आता प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून समोर आलेली शेतकरी आत्महत्या ही, यादीत नाव नसल्याने झाल्याचे परिवाराने स्पष्ट केल्याने, आता प्रशासनावर प्रश्न निर्माण केले जात आहेत. यावर आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, ह्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.









Add Comment