महासूत्र न्यूज
उमरखेड : भटक्या कुत्र्यांवरून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धडकला. त्यानुसार उमरखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी, नगरपरिषदेने विशेष मोहीम हाती घेतली. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात, चावण्याच्या घटना तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत, ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
उमरखेड नगरपरिषदेची सदर मोहीम आरोग्य विभागाच्या देखरेखीत नियोजनबद्ध सुरू आहे. या मोहिमेदरम्यान, प्रशिक्षित पथकाने शहरातील विविध भागांतून, आतापर्यंत एकूण ५४६ भटकी कुत्री सुरक्षितरीत्या पकडली. तर त्यापैकी ५२८ कुत्र्यांचे, शासनाच्या ॲनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रमांतर्गत, निर्बीजीकरण व रॅबीज प्रतिबंधक लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही कार्यवाही महागाव रोडवरील नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पा शेजारील, अधिकृत केंद्रात केली जात आहे. नगरपरिषदेने शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षित अंतर राखावे तसेच भटक्या कुत्र्यांबाबत कोणतीही तक्रार किंवा माहिती असल्यास नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.











Add Comment