भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : मृदा व जलसंधारण विभागाच्या पुनर्रचनेच्या नावाखाली, उमरखेड येथील जलसंधारण उपविभागीय कार्यालयच, हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती धडकली आहे. एव्हाना चक्क १५ ऑगस्ट पर्यंत उमरखेडचे कार्यालय, पुसदला सुरू करण्याचे, लेखी पत्रच, जिल्हा मृदा व जलसंधारण कार्यकारी अभियंत्यांचे, असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या वृत्ताने मात्र नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, उमरखेडचे एक एक कार्यालय पळविण्याचा, मोठा घाट घातला जात असल्याचे, पुन्हा एकदा समोर येत आहे.
उमरखेड येथे कार्यरत असलेले हे कार्यालय, पुसद येथे हलविण्याची तयारी सुरू झाली असून, सदर ऑफिसाठी जागा पाहण्याचे कामही, विभागाकडून सुरू करण्यात आल्याची, खळबळ जनक माहिती समोर आली आहे. विभागाने गोपनीय पद्धतीने, मागील आठवड्यात काढलेल्या एका पत्रानुसार, १५ ऑगस्टपासून हे कार्यालय पुसद येथून काम पाहणार असल्याचा, विभागाचा निर्णय झाल्याची माहिती आहे. मात्र या निर्णयाला विरोध वाढणार असल्याचे, निश्चित मानले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागाने नवीन प्रशासकीय रचनेनुसार, विविध ठिकाणी नवीन उपविभागीय कार्यालये निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात नेर, राळेगाव व केळापूर येथे नवीन कार्यालयांची निर्मिती करण्यात येत आहे. तर उमरखेड येथील कार्यालय पुसद येथे स्थलांतर करण्याचे ठरले आहे
उमरखेड, महागाव आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी मृदा व जलसंधारणाशी संबंधित विविध कामांसाठी हे कार्यालय महत्त्वाचे आहे. कार्यालय पुसदला हलविल्यास, उमरखेड तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि लाभार्थ्यांना वारंवार पुसदची वारी करावी लागणार असून वेळ, पैसा आणि श्रमाचा अतिरिक्त भार सहन करावा लागेल. विशेषतः दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
मृदा व जलसंधारण विभागाशी संबंधित कामांसाठी शेतकऱ्यांना, नागरिकांना तसेच लोकप्रतिनिधींना कार्यालयाशी वारंवार संपर्क साधावा लागतो. कार्यालय पुसद येथे गेल्यास अंतर वाढणार, वेळ व आर्थिक खर्च वाढणार आणि ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होणार, अशी भीती व्यक्त होत आहे.
त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करून उमरखेड येथील जलसंधारण उपविभागीय कार्यालय हलवू नये, अशी जोरदार मागणी होत असून, सदर कार्यालये ग्रामीण भागाच्या सोयीसाठी की ग्रामीण नागरिकांना अधिक दूर नेण्यासाठी? असा संतप्त सवाल आता, उमरखेडकरांकडून उपस्थित केला जात आहे.
उमरखेड पुसदला तर महागाव दिग्रसला अटॅच
उमरखेड येथील विद्यमान कार्यालयाकडे, उमरखेड, महागाव व पुसद अशी कार्यालयीन रचना, आजवर कार्यरत होती. मात्र आता उमरखेडचे कार्यालय पळवून, थेट पुसदला स्थलांतरित करणार आहेत. तर महागाव तालुका हा दिग्रसला जोडण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती आहे. त्यामुळे यापुढे, उमरखेड व महागाव, पुसद व दिग्रसला जोडले गेल्यास, संपूर्ण विधानसभाच वाऱ्यावर गेल्याचे चित्र निर्माण होणार आहे. शिवाय दोन्ही तालुक्यातील जनतेला याचा मोठा नाहक त्रास, सहन करावा लागणार आहे. हे मात्र निश्चित मानले जात असल्याने, या बदलाचा मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत.
विभागाचे कॅबिनेट व राज्यमंत्री जिल्ह्यातीलच!
विशेष, या विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आहेत तर राज्य मंत्री इंद्रनील नाईक आहेत. गंमत म्हणजे दोघेही जिल्ह्यातीलच आहेत. तेव्हा, या कार्यालय बदलण्यात, नेमकी कोणाची भूमिका कोणती, यावरून आता चर्चा रंगणार आहे.
भौगोलिक क्षेत्र मोठे असताना कार्यालय हलविण्याचा अट्टहास कशासाठी? – आमदार वानखेडे
उमरखेड- महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे यांनीही, या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. उमरखेड व महागाव मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून दोन्ही तालुक्यांसाठी उमरखेड येथे स्वतंत्र कार्यालय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी, म्हटले आहे. उमरखेडच्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांना, घरी बोलून कान उघाडणी केल्याचीही माहिती आहे.
मात्र, आमदार किसनराव वानखेडे हे खुद्द सत्ताधारी आमदार असताना, कार्यालय बदलण्याची खेळी कोणी खेळत असेल तर, त्यांनी आपले वजन वापरून, हे हाणून पाडले पाहिजे, असाही सूर उमटत आहे.












Add Comment