महासूत्र न्यूज
उमरखेड : बदलत्या शैक्षणिक प्रवाहासोबत शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य चितांगराव कदम यांनी केले.
आय.एस.ओ. मानांकित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागापूर येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील समूह साधन केंद्र कुपटीची पहिली ‘शिक्षण परिषद’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थी केंद्रित अध्यापन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शिक्षकांच्या अनुभवांची देवाणघेवाण हा परिषदेचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चितांगराव कदम होते. प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय बेतेवाड यांनी शिक्षकांना, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रभावी अध्यापन, तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. समूह साधन केंद्र प्रमुख डॉ. दीपक ढोक यांनी प्रास्ताविकातून परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट केली.
यावेळी शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनातील अनुभव, नाविन्यपूर्ण उपक्रम, डिजिटल साधनांचा वापर आणि शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविता येणाऱ्या विविध उपक्रमांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. त्यामुळे परिषद ही केवळ औपचारिकता न ठरता शिक्षकांच्या शैक्षणिक चिंतनाला आणि अनुभवांच्या देवाणघेवाणीला प्रभावी व्यासपीठ ठरली.
इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या शिस्तबद्ध शालेय परिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन मुख्याध्यापक सतीश घोडके यांनी केले, तर आभार किशोर कदम यांनी मानले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी कैलास गारोळे, संदीप कवडे, छाया चाकोरे, उज्वला कलाने, पद्मावती लोमटे, नानासाहेब कदम व वच्छला राठोड यांनी परिश्रम घेतले. कुपटी समूह केंद्रातील एकूण ४७ मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.












Add Comment