भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : कोणत्या उपचारांवर खर्च किती लागणार, याचे दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याभरातील खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना, विविध वैद्यकीय सेवा व सुविधांचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्यासह यवतमाळ जिल्ह्याभरातील सर्वच खासगी रुग्णालय व दवाखान्यांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
उपचारांचा खर्च समजणार आधीच!
अनेकदा रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विविध सेवा, तपासण्या आणि सुविधांच्या शुल्काबाबत संभ्रम निर्माण होतो. काही वेळा बिलाच्या रकमेवरून रुग्ण आणि रुग्णालय प्रशासनामध्ये वादही होतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी रुग्णालयांनी सेवा व सुविधांचे दर स्पष्टपणे जाहीर करावेत, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात, नोंदणी कक्षाजवळ किंवा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. हे दरपत्रक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असावे. रुग्णालयाने शुल्कात बदल केल्यास दरपत्रकही तातडीने अद्ययावत करावे लागणार आहे.
बिलिंग काउंटरवरही मिळणार मार्गदर्शन
रुग्णालयातील नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष आणि बिलिंग काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी रुग्णांना लागू असलेल्या सेवा शुल्कांची व विविध उपचार पॅकेजच्या दरांची माहिती द्यावी. परदेशातून मेडिकल व्हिसा किंवा आयुष व्हिसावर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांनी त्यांच्यासाठी लागू असलेले विशेष पॅकेज दरही स्पष्टपणे प्रदर्शित करावेत, असे निर्देश आहेत.
नियम मोडल्यास कारवाईचे निर्देश
मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालये व वैद्यकीय आस्थापनांना महाराष्ट्र नर्सिंग होम नियमावली, २०२१ मधील तरतुदींनुसार संबंधित सेवा व सुविधांचे दर प्रदर्शित करावे लागणार आहेत.
रुग्णालयांची नोंदणी, नियमन आणि देखरेख करणाऱ्या सक्षम प्राधिकरणांनी या नियमांच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घ्यावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित वैद्यकीय आस्थापनांना या निर्देशांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
दरपत्रकामुळे रुग्णांना उपचारांचा संभाव्य खर्च आधीच समजण्यास मदत होणार असून, वैद्यकीय सेवांमधील पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा आहे. आता यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि उमरखेड तालुक्यातील संबंधित रुग्णालये या नियमांची कितपत अंमलबजावणी करतात, याकडे रुग्ण व नागरिकांचे लक्ष लागले आहे.












Add Comment