भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : उमरखेडच्या शहीद भगतसिंग नगर परिषद मराठी शाळा क्र. २, या शाळेतील खेळाडूंच्या मैदानावरील दमदार कामगिरीने, शाळेसह शहराचे नावलौकिक उंचावले आहे. नुकत्याच, गोपिकाबाई गावंडे कॉलेजच्या मैदानावर पार पडलेल्या तालुका क्रीडा स्पर्धेत, वेगळी छाप उमटवली आहे. तालुका क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये, मुला-मुलींनी विविध क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष म्हणजे या खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची, आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने, खेळाडूंचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
मुलांच्या गटातही पदकांची लयलूट
१४ वर्ष आतील वयोगटात ४०० मीटर धावण्यात, दिगंबर कामारकर याने प्रथम क्रमांक पटकावला. थाळीफेकमध्ये सोहम उपेवाड याने बाजी मारली. १०० मीटर धावण्यात सोहम उपेवाड व फरहाण खान यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, तर १०० बाय ४ मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
१७ वर्ष आतील वयोगटात २०० मीटरमध्ये, फरहाण खान व प्रद्युम्न राठोड, तर ६०० मीटरमध्ये फरहाण खान याने चमकदार कामगिरी केली. गोळाफेकमध्ये प्रद्युम्न राठोड याने तृतीय क्रमांक मिळविला. ८० मीटर हर्डल आणि हॅमर थ्रोमध्ये प्रथम, १०० बाय ४ मीटर रिलेमध्ये द्वितीय, तर ४०० बाय ४ मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी आपले क्रीडा कौशल्य सिद्ध केले.
मुलींनीही उमटवली दमदार छाप
१४ वर्ष आतील मुलींच्या वयोगटात ६०० मीटर धावण्यात, प्रगती इंगोले प्रथम, तर नंदिनी रुडे द्वितीय आली. गोळाफेकमध्ये राखी वाढवे हिने प्रथम क्रमांक मिळविला. ४०० मीटरमध्ये आचल राठोड प्रथम व प्रगती इंगोले द्वितीय ठरल्या.
२०० मीटर धावण्यात समीक्षा उत्तरवार प्रथम, तर श्रावणी घनसारवाड द्वितीय आली. १०० बाय ४ मीटर रिले प्रकारात उमरखेड तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत मुलींच्या संघानेही दमदार कामगिरी केली.
विजेता खेळाडूंचे अभिनंदन!
या उल्लेखनीय यशाबद्दल उमरखेडच्या नगराध्यक्षा तेजश्री संतोष जैन, मुख्याधिकारी अजय कुरवाडे, जनशक्ती पॅनलचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, शिक्षण सभापती रसूल पटेल यांच्यासह जनशक्ती पॅनलच्या सर्व सभापती व सदस्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
झालेल्या खेळांमध्ये खेळाडूंच्या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक आशिष राठोड, क्रीडा शिक्षक गोपाल मुनेश्वर तसेच सर्व शिक्षक-शिक्षिकांचे मार्गदर्शन व परिश्रम मोलाचे ठरले. तालुका स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही शाळेचे खेळाडू दमदार कामगिरी करतील, असा विश्वास शिक्षकवृंदाने व्यक्त केला.












Add Comment