उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • महागाव • यवतमाळ जिल्हा

दुष्काळ मदत: उमरखेड-महागाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीक विमा व दुष्काळी मदत तातडीने द्या – आमदार किसनराव वानखेडे यांची कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे मागणी!

भारती महाराज महासूत्र न्यूज

 उमरखेड :  महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथे, अमरावती विभागातील पिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीत उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे आमदार किसनरावजी वानखेडे यांनी शासनाचे लक्ष वेधून घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्हा, विशेषतः उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी पीक विम्याच्या संदर्भात केवळ सॅटेलाईट पाहणी ग्राह्य न धरता महसूल व कृषी विभागाचा अहवाल ग्राह्य धरून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार वानखेडे यांनी केली.

 

उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील सद्यस्थिती अत्यंत गंभीर आहे. पावसाचे अपुरे प्रमाण तसेच पावसामध्ये पडलेले प्रदीर्घ खंड यामुळे मतदारसंघातील शेती व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. विशेषतः मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावरील माळरानावरील शेती तसेच बंदी भागातील पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे.

 

अनेक ठिकाणी उभी पिके कोमेजून जाऊन करपण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांसमोर मोठ्या पीकहानीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे मतदारसंघातील सद्यस्थितीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती दुष्काळी उपाययोजना लागू करावी, अशी मागणी आमदार किसनराव वानखेडे यांनी केली.

 

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या 

उमरखेड-महागाव मतदारसंघातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई, पीक विम्याचा लाभ आणि आवश्यक त्या सर्व दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी आमदार किसनराव वानखेडे यांनी बैठकीत केली. शेतकऱ्यांच्या अडचणींचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

या बैठकीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके, कामगार मंत्री आकाशजी फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर,खासदार अनुप धोत्रे, आमदार चैनसुख संचेती, आमदार किसनरावजी वानखेडे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार राजू तोडसाम, आमदार प्रविण तायडे, आमदार राजेश वानखडे, आमदार हरिश पिंपळे, आमदार श्वेताताई महाले, कृषी सचिव परिमल सिंह यांच्यासह जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक, महसूल, कृषी व महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.