भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : उमरखेड शहरासह संपूर्ण तालुक्यात सध्या प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. रस्त्यांवरून धावणाऱ्या शेकडो मुदतबाह्य स्क्रॅप आणि भंगार ऑटोरिक्षांमधून सर्रासपणे, उघड उघड अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शहरात अधिकृत ‘मीटर’ असलेल्या ऑटोंचा पत्ताच नसून, विनामीटर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची राजरोस आर्थिक लूट केली जात आहे. यासह मुदत बाह्य प्रवासी वाहनांची ही, रस्त्यावर रीग वाढली आहे. अशा या गंभीर प्रकाराकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे साफ दुर्लक्ष होत असून, आरटीओ विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
शासकीय नियमांनुसार १५ वर्षांपेक्षा जुनी झालेली आणि तांत्रिक योग्यता प्रमाणपत्र म्हणजेच फिटनेस नसलेली वाहने, स्क्रॅप करणे बंधनकारक आहे. मात्र, उमरखेड ते ढाणकी, महागाव, पुसद आणि ग्रामीण भागातील अंतर्गत मार्गांवर पूर्णपणे खिळखिळ्या झालेल्या, धूर सोडणाऱ्या भंगार रिक्षा प्रवाशांनी गच्च भरून धावत आहेत. अधिक प्रवासी मिळवण्याच्या शर्यतीत हे रिक्षाचालक वाहने अवाजवी वेगाने चालवतात, ज्यामुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तात्काळ विशेष मोहीम राबवून विनापरवाना व भंगार ऑटो जप्त करण्यात यावेत, अशी मागणी आता नागरिकांकडून पुढे केली जात आहे.
विनामीटर ऑटोंचा सुळसुळाट
यवतमाळ जिल्ह्यात मीटर सक्तीचे आदेश कागदावरच राहिले आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे, उमरखेड शहर व तालुक्यात धावणाऱ्या शेकडो ऑटोरिक्षांपैकी एकाही रिक्षामध्ये मीटरचा वापर केला जात नाही. खाजगी वापराच्या पांढऱ्या नंबर प्लेटच्या वाहनांचा वापर, व्यावसायिक वाहतुकीसाठी केला जात आहे. मनमानी भाडे आकारून गोरगरीब प्रवाशांची खिसेकापूगिरी केली जात असतानाही, आरटीओचे अधिकारी मात्र सुस्त का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आरटीओ साहेब, कारवाई कधी होणार?
शासनाने कालबाह्य वाहनांवर कारवाई करण्यासाठी ऑक्टोबरची अंतिम मुदत दिली होती. यवतमाळच्या काही भागात तात्पुरती कारवाई दाखवली जात असली, तरी उमरखेड तालुका आरटीओच्या रडारवरून गायब असल्याचे दिसते. शहरात मुख्य चौकातून आणि बस स्थानक परिसरातून डोळ्यांदेखत ही अवैध वाहतूक सुरू असताना आरटीओ प्रशासन ढिम्म का आहे? आरटीओचे ‘भरारी पथक’ उमरखेडमध्ये कधी उतरणार आणि या भंगार वाहनांवर कधी दंडात्मक व जप्तीची कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
प्रवासी वाहनांची फिटनेस कोण चेक करणार
गंमत म्हणजे ऑटोसह विविध प्रकारची प्रवासी वाहतूक, सर्व तालुक्यात खुलेआम सुरू आहे. त्यावर पाय बंद घालणारा आरटीओ विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे बोलल्या जात आहे. ओरड झाल्यावरच तपासणी करून तात्पुरती कार्यवाही करण्याची गरज का पडते असाही प्रश्न आहे. सणासुदीच्या तोंडावर रस्त्यावर धावणाऱ्या सर्वच प्रकारच्या प्रवासी वाहनांची कसून चौकशी करण्यात, आरटीओ विभाग अयशस्वी ठरताना दिसत आहे. त्यामुळे अशा वाहनांची, फिटनेस तपासणी करणार कोण, असा प्रश्न उभा झाला आहे.












Add Comment