भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : संवेदनशील समजल्या जाणाऱ्या, उमरखेड गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आलेले, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) डॉ. महेश पाटील यांच्या आश्वासनातून, शहराला एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी आदेश काढून बंद करण्यात आलेली, उमरखेडची बंद वाहतूक शाखा (Traffic Branch), गणेशोत्सव संपताच पूर्ववत सुरू करण्यात येईल असे आश्वासन, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून आयजी पाटील यांनी दिले. गंमत म्हणजे, हा सर्व प्रकार जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या समक्ष घडला. मात्र यामुळे विस्कळीत झालेल्या उमरखेडच्या वाहतुकीला पुन्हा एकदा, कडक शिस्त लागण्याचे संकेत मिळाले आहेत.
संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरखेड शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी अमरावतीचे आयजी डॉ. महेश पाटील यांनी अचानक भेट दिली. त्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणूक मार्गाची बारकाईने पाहणी केली. यानंतर नगरपरिषद, महावितरण, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. सणासुदीच्या काळात शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आणि कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याच्या वजनदार सूचना दिल्याची माहिती आहे.
या दौऱ्यादरम्यान, आयजी पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी पोहचलेल्या माध्यम प्रतिनिधींनी, गणेशोत्सव बाबतच्या प्रश्नानंतर, शहरातील बंद करण्यात आलेल्या वाहतूक शाखेवरून, आयजींसमोर प्रश्न उपस्थित केला. ‘वाहतूक शाखा मागील दोन महिनांपूर्वी का बंद करण्यात आली? या निर्णयाचा मोठा परिणाम, वाहतूक व्यवस्थेवर झाला असल्याचे सांगितले. तसेच उमरखेड हे केवळ संवेदनशीलच नसून, मराठवाड्यासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांच्या बॉर्डरला जोडणारे मुख्य केंद्र आहे. अशा मोक्याच्या ठिकाणी वाहतूक शाखा अत्यंत आवश्यक असताना, ती का बंद ठेवली?’ असा रोख प्रश्न माध्यमांनी, एसपी कुमार चिंता यांच्या उपस्थितीतच केला.
आता आपल्याच अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर, जाहीरपणे प्रश्न विचारला गेल्याने, काही वेळ आयजी डॉ महेश पाटील अडचणीत सापडले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी एसपी आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच, “गणेशोत्सवानंतर उमरखेडची वाहतूक शाखा पूर्ववत सुरू करण्यात येईल”, असे स्पष्ट आश्वासन दिले. यामुळे उमरखेड करांच्या सेवेत पुन्हा एकदा वाहतूक शाखा कार्यरत होऊन, कडक शिस्त निर्माण होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील, तहसीलदार राजेश सुरडकर, ठाणेदार शंकर पांचाळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या दोन महिन्यात शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. मुळात चौकाचौकात कोंडीचे चित्र ही पाहायला मिळत आहे. आता थेट आयजींनीच या प्रकरणात शब्द दिल्यामुळे, बंद पडलेली ही शाखा मात्र, पुन्हा एकदा सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे लवकरच गणेशोत्सव काळ संपताच, उमरखेडच्या रस्त्यांवर “ट्रॅफिक शाखा” शिस्त निर्माण करेल, अशी आशा आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
वाहतूक शाखा बंद होण्यात राजकीय दबावाची चर्चा
गत दोन महिन्यापूर्वी एसपी कुमार चिंता यांनी, कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवत,उमरखेडची वाहतूक शाखा बंद करून, कर्मचाऱ्यांना उमरखेड पोलिस स्टेशनमध्ये मर्ज करण्याचे आदेश काढले होते. उमरखेडची वाहतूक शाखा बंद होण्यामागे, स्थानिक राजकीय दबाव असल्याची जोरदार चर्चा, शहरात उमटल्या होत्या. या निर्णया विरोधात अनेकांनी निवेदन दिल्याचेही पुढे आले असून, निर्णयाचा विरोध अद्यापही सुरूच आहे.
ठाणेदार पांचाळ यांच्यावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण
मुळात, शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी, ठाणेदार शंकर पांचाळ यांच्यावर आहे. त्यात ते यशस्वी ठरतांना दिसत आहेत. मात्र वाहतूक सुरळीत करण्याचे अतिरिक्त काम ही, आता त्यांच्या खांद्यावर वर येऊन पडल्याने, धावपळ मात्र वाढली असल्याचे, पोलिस सूत्रांकडून बोलल्या जात आहे.












Add Comment