भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : तालुक्यातील हरदडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील, कथित अनागोंदी कारभाराविरोधात, पालकांनी विद्यार्थ्यांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालययात, ५ ऑगस्टला धडक देत, तीन तास ठिय्या आंदोलन केले होते. मुख्याध्यापक, शिक्षक व केंद्रप्रमुखावर गंभीर आरोप केले होते. यावर उत्तर देताना प्रभारी गटशिक्षण अधिकारी बेतेवाड यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. प्रकरणी शेवटी, प्रशासनाने चौकशी समिती गठित केली असून, तात्काळ अहवाल देण्याचा आदेश दिल्याचे पत्र समोर आले आहे.
आक्रमक झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या तक्रारीने, उमरखेड शिक्षण विभागावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हा कारभार यवतमाळच्या वरिष्ठांपर्यंत पोहचताच, वरूनही चांगलीच कानउघडणी झाल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान, याची दखल घेत, प्रशासनाने संबंधित शाळेतील सहाय्यक शिक्षक अमोल लव्हारे, प्रभारी मुख्याध्यापक भुजाजी जाधव यांच्याविरुद्ध चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
विभागाने पाच ऑगस्ट रोजी काढलेल्या चौकशी समितीच्या पत्रानुसार, यामध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी सतीश दिघडे, शिक्षण विस्तार अधिकारी चंदा ढोणे व केंद्रप्रमुख विनायक वानखेडे ही तीन सदस्यीय समिती, चौकशी करणार आहे. चौकशी पूर्ण होताच तात्काळ चौकशीचा अहवाल, कार्यालयास सादर करण्याच्या आदेश गटशिक्षणाधिकारी यांनी दिले आहे. पालकांच्या आरोपानुसार, विद्यार्थ्यांची पटसंख्या ४८ वरून २४ वर आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. शिक्षकांचे अध्यापन कडे दुर्लक्ष, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसविणे, पालक सभा न घेणे, शाळेमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे, तसेच शाळेतच दारू पिण्याचे प्रकार, अशा खळबळ जनक व शिक्षण क्षेत्राला कलंक लावणाऱ्या तक्रारी पालक व विद्यार्थ्यांनी, ठिय्या आंदोलनावेळी केल्या होत्या.
एकंदरीत आता चौकशी समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले असून, चौकशीतून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे. या चौकशीतून संबंधितांवर कार्यवाही होते, की मग पद्धतशीरपणे वाचविले जाते, हे पाहणे ही महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
केंद्रप्रमुखांना वाचविण्याचा प्रयत्न?
पालकांनी केलेल्या ठिय्या आंदोलनावेळी, त्या विभागाचे केंद्रप्रमुख यांच्यावरही, संबंधित शिक्षकांवर वेळीच कार्यवाही न करण्याचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्या कामाबाबतही, पालकांनीच नाराजी बोलून दाखविली होती. असे असताना सुद्धा, शिक्षण विभागाने, काढलेल्या आदेशानुसार, चौकशीच्या रडारवरून, केंद्रप्रमुखांना हळूच बाजूला केल्याने, चौकशीवरच शंका उत्पन्न केली जात आहे.
कोट
केंद्रप्रमुखांची ही चौकशी होईल
सदर हरदडा शाळा चौकशी प्रकरणी, पालकांनी करण्यात आलेल्या आरोपानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. संबंधित प्रभारी मुख्याध्यापक व शिक्षकांची चौकशी केली जाणार आहे. शिवाय समितीमध्ये नवे केंद्रप्रमुख सामील केले आहेत. चौकशी मध्ये सध्याचे केंद्रप्रमुख दोषी आढळल्यास, त्यांच्यावर ही कार्यवाही करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया उमरखेडचे गट शिक्षणाधिकारी विजय बेतेवाड यांनी महासुत्रशी बोलताना दिली.












Add Comment