भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : जंगलव्याप्त आणि बंजारा-आदिवासीबहुल भागातील नागरिकांना दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्यसेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान, प्रत्यक्ष सेवेत प्रभावीपणे राबवावे. यामुळे दुर्गम भागातील आरोग्यसेवेचा स्तर निश्चितच उंचावेल, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी केले.
उमरखेड तालुक्यातील कोरटा प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ ऑगस्ट रोजी CPHC (Comprehensive Primary Health Care) प्रशिक्षणाचे अंतिम सत्र पार पडले. यावेळी ते प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.
यवतमाळ जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कृष्णदास बनोत व डॉ क्रांतीकुमार नावंदीकर यांच्या उपस्थितीत, उमरखेड तालुक्यातील शेवटचे CPHC प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. या प्रशिक्षणात कोरटा व थेरडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील, प्रशिक्षणार्थींना विविध आरोग्यविषयक बाबींचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय कळंबचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर मडावी, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ परशुराम किरवले, बाबुळगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ संघर्ष राठोड, उमरखेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील दुबे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ संतोष सकर्गे, तसेच हेमलता वैद्य व अर्चना गोळेकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
उमरखेड तालुक्यातील सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये CPHC प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल डॉ. ढोले यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या अवयवदान सप्ताहानिमित्त उपस्थित अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली. तसेच अवयवदानासाठी संमतीपत्रही देण्यात आले.
प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील दुबे, वैद्यकीय अधिकारी डॉ वैष्णवी राखुंडे, डॉ संदीप शिंदे, डॉ संदीप हांडे, आरोग्य सहायिका सुनिता सहारे तसेच आरोग्य सहाय्यक सुरेश खोकले व सटवा चिरमाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.












Add Comment