४४० क्विंटलहून अधिक तांदूळ जप्त; दोन्ही कारवायांत ५४ लाखांचा मुद्देमाल, आठ जणांविरुद्ध गुन्हे
भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : गोरगरिबांच्या हक्काचा रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात वळविण्याचा गंभीर प्रकार महागाव तालुक्यात उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ आणि महागाव पोलिसांनी स्वतंत्रपणे केलेल्या दोन कारवायांत तब्बल ४४०.७३ क्विंटल तांदळासह दोन ट्रक असा एकूण सुमारे ५४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही प्रकरणांत चालक, ट्रक मालक आणि तांदळाच्या मालकांसह एकूण आठ जणांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महागाव तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या काळाबाजाराचा हा प्रकार दोन स्वतंत्र कारवायांमधून समोर आला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही ट्रक वेगवेगळ्या दिवशी पोलिसांच्या ताब्यात आले असून, त्यातील तांदळाची तपासणी आणि प्रशासकीय पडताळणीनंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
एलसीबीची पहिली कारवाई : १९४.९६ क्विंटल तांदूळ
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पुसद कॅम्प पथकाने २४ ऑक्टोबर रोजी नागपूर-तुळजापूर मार्गावर महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रक क्रमांक MH-26-BE-1821 पकडला. या ट्रकमध्ये तांदळाची पोती आढळून आली. चालक अंबादास नंदू व्यवहारे याच्याकडे तांदळाच्या वाहतुकीसंदर्भातील खरेदी पावती, बिल्टी किंवा वैध परवाना मागितला असता, कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत.
त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ असल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. तहसील कार्यालयाकडून प्राप्त अहवालात ट्रकमधील १९४.९६ क्विंटल तांदूळ हा शासकीय सार्वजनिक वितरण प्रणालीतील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चालक अंबादास व्यवहारे, शेख शौकत शेख महताब आणि देगलूर येथील वाजिद (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
महागाव पोलिसांची दुसरी कारवाई : २४५.७७ क्विंटल तांदूळ
दुसरी कारवाई २३ ऑक्टोबर रोजी महागाव पोलिसांनी केली होती. महागाव-नांदगव्हाण मार्गावर ग्राम नांदगव्हाणजवळ MH-26-AD-1778 क्रमांकाचा ट्रक संशयास्पद स्थितीत आढळून आला. पोलिसांनी चालक मोहम्मद खलील मोहम्मद शफी याच्याकडे चौकशी केली असता, ट्रकमधील तांदळाच्या वाहतुकीसंदर्भातील वैध कागदपत्रे त्याच्याकडे नव्हती.
त्यानंतर ट्रक पोलीस ठाण्यात आणून तहसील प्रशासनाच्या माध्यमातून धान्याची तपासणी करण्यात आली. विविध रंगांच्या जुन्या पोत्यांमध्ये भरलेल्या तांदळाचे नमुने घेऊन शासकीय गोदामातील धान्याशी पडताळणी करण्यात आली. त्यात तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याशी मिळताजुळता असल्याचे तसेच फोर्टिफाइड तांदळाचे कण आढळल्याचे नमूद करण्यात आले. अधिकृत प्रयोगशाळेकडे नमुने पाठविण्यात आले असून, तहसील प्रशासनाच्या अहवालानुसार २४५.७७ क्विंटल तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील असल्याचे नमूद करून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली.
या प्रकरणात चालक मोहम्मद खलील मोहम्मद शफी, ट्रक मालक शेख अतिक शेख खदीर तसेच तांदळाचे मालक रोहित श्यामसुंदर गोयंका, बालाजी व्यंकटराव जाधव आणि हरजी संभाजी राजेगोरे यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
५४ लाखांचा मुद्देमाल जप्त; धान्याच्या काळाबाजाराचे जाळे किती मोठे?
या दोन्ही कारवायांत मिळून ४४०.७३ क्विंटल तांदूळ जप्त झाला आहे. पहिल्या प्रकरणात तांदूळ व ट्रकची किंमत सुमारे २७ लाख रुपये, तर दुसऱ्या प्रकरणात तांदूळ व ट्रकची किंमत २७ लाख ४४५ रुपये असल्याचे नमूद आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणांतील जप्त मुद्देमालाची एकत्रित किंमत सुमारे ५४ लाख रुपये होते.
काळाबाजार करणारी साखळी पुढे आणण्याचे जिल्हा पोलिसांसमोर आव्हान!
रेशनच्या धान्याचा लाभ गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्याऐवजी ते मोठ्या प्रमाणात ट्रकद्वारे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे या कारवायांमधून समोर आले आहे. मात्र, या धान्याचा मूळ पुरवठा कुठून झाला, ते कोणत्या रास्तभाव दुकानांशी किंवा पुरवठा साखळीशी संबंधित आहे आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तपास होणे महत्त्वाचे आहे. केवळ ट्रक पकडण्यापुरती कारवाई न थांबता या काळाबाजाराच्या मुळापर्यंत प्रशासन पोहोचणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.












Add Comment