Criem • Maharashtra • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

Umarkhed gelatin blast: जिलेटिन स्फोटकांचा काळाबाजार उघड, तपासाच्या कडा विस्तारल्या पुन्हा सहा जणांना अटक !

IPS गौरव कायंदे पाटील यांच्या तांत्रिक तपासातून स्फोटक पुरवठ्याची साखळी उघड ; बारकोड आणि PESO रेकॉर्डने उलगडले धागेदोरे

भारती महाराज महासूत्र न्यूज 

यवतमाळ (उमरखेड) : शहरातील ढाणकी रोडवरील किसान वेल्डिंग वर्कशॉपसमोर झालेल्या भीषण जिलेटिन स्फोट प्रकरणाचा तपास, आता अधिक व्यापक झाला आहे. पाच जणांचा बळी घेणाऱ्या आणि दहा जणांना जखमी करणाऱ्या या दुर्घटनेच्या तपासात, उपविभागीय पोलीस अधिकारी IPS गौरव कायंदे पाटील यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे स्फोटक पुरवठ्याची साखळी उघड केली आहे. या प्रकरणात १ नोहेंबरला नव्याने आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असून, परवानाधारक स्फोटक व्यापारी आणि शॉर्ट फायरर यांच्यापर्यंत तपास पोहोचल्याने, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

 

या प्रकरणात , दिगंबर राजाराम डुकरे (४६) रा नागापूर रुपाळा उमरखेड , राजेंद्र लक्ष्मण वानखेडे (३६) रा कोपरा उमरखेड, जगदीश नंदरामजी गुर्जर (३६)  मातेश्वरी एंटरप्रायझेस, आखाडा बाळापूर,  अर्जुनसिंग सज्जनसिंग राजपूत (४१) तिरुपती एंटरप्रायझेस दारव्हा, गोपाल सुखदेवजी चौधरी (५४) तिरुपती एंटरप्रायझेस, दारव्हा आणि लादूलाल हिरालाल गुर्जर (४६) मातेश्वरी एंटरप्रायझेस, आखाडा बाळापूर, असे नव्याने अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहे.

 

गत २६ सप्टेंबर रोजी उमरखेड शहरातील ढाणकी रोडवर ब्लास्टिंग ट्रॅक्टरचे वेल्डिंग सुरू असताना, अचानक भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू, तर दहा जण जखमी झाले होते. घटनेनंतर उमरखेड पोलिसांनी ट्रॅक्टरमालक, चालक आणि स्फोटक पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, स्फोटकांचा मूळ स्रोत आणि त्यांची बेकायदेशीर विक्री याबाबत तपास सुरू होता.

 

या तपासात पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या स्फोटकांच्या बारकोड क्रमांकांचा आधार घेतला. सोलार इंडस्ट्रीज, नागपूर आणि पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) यांच्या नोंदींच्या आधारे, तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून स्फोटकांचा पुरवठा, त्यांची विक्री आणि वापर यासंदर्भातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

 

पोलिसांच्या तपासानुसार, परवानाधारक व्यापारी आणि शॉर्ट फायरर यांनी अधिकृत कामासाठी असलेला स्फोटक साठा, नियमबाह्य पद्धतीने दुसरीकडे वळवला. त्यासाठी बनावट नोंदी तयार करून विनापरवाना व बेकायदेशीर विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. या स्फोटकांच्या अयोग्य हाताळणीतून उमरखेडमधील भीषण दुर्घटना घडल्याचे, तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

 

आतापर्यंत या प्रकरणातील आरोपींचा आकडा आता ९ वर पोहचला आहे. या पूर्वी  ट्रॅक्टर मालक अप्पाराव माधवराव बोक्से (५५) रा बाळदी ता. उमरखेड, ट्रॅक्टर वरील चालक वैभव अप्पाराव बोक्से (२०) रा बाळदी उमरखेड या बोक्से पिता पुत्राचा याच स्फोटात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ढाणकी येथील जिलेटीन पुरवठादार बळीराम नरवाडे (५५) यांना अटक करण्यात आली होती. यात अद्याप जमीन मिळाला नसल्याने सध्या ते जेलमध्ये आहेत. यात पुन्हा नव्याने ६ जणांना अटक झाल्याने, अटकेतील आरोपींची संख्या आता ७ झाली आहे.

 

सुरुवातीला स्थानिक पातळीवरील स्फोटक बाळगणे आणि पुरवठ्यापुरते मर्यादित वाटणारे हे प्रकरण आता, स्फोटकांच्या परवानाधारक पुरवठादारांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्फोटकांची साठवणूक, वाहतूक, विक्री आणि प्रत्यक्ष वापराच्या नोंदींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे धागेदोरे समोर येतात आणि स्फोटकांच्या बेकायदेशीर व्यवहाराची व्याप्ती किती मोठी आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कार्यवाही या प्रकरणाचे तपास अधिकारी उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक आयपीएस गौरव कायंदे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

 

पोलिसांसमोर मोठे आव्हान?

आता या प्रकरणाच्या पुढील चौकशीत, अधिकृत साठ्यातील स्फोटके बेकायदेशीरपणे बाहेर कशी पडली, बनावट नोंदी कोणी आणि कुठे तयार केल्या, स्फोटकांच्या विक्रीत आणखी कोण सहभागी होते, स्फोटकांची वाहतूक आणि साठवणूक कोणाच्या देखरेखीखाली झाली, तसेच या व्यवहाराची व्याप्ती केवळ उमरखेड व जिल्हापुरतीच पुरतीच मर्यादित आहे की, मग विदर्भ व मराठवाड्यापर्यंत पसरलेली आहे का? अशा सर्व खमक्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.