Maharashtra • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

उमरखेडला डीजेला फाटा: ढोल-ताशांच्या गजरावर थिरकली तरुणाई, बाप्पाला निरोप !

उच्च न्यायालयाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी ; पारंपरिक वाद्यांच्या तालावर रंगली विसर्जन मिरवणूक, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

भारती महाराज महासूत्र न्यूज

उमरखेड : उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन, प्रशासनाची ठाम भूमिका आणि गणेश मंडळांचा समंजसपणा यामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक उत्सवाचे स्वरूप लाभले. डीजेच्या दणदणाटाला फाटा देत ढोल-ताशे, लेझिम, भजनी मंडळे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात उमरखेडकरांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. प्रमुख मार्गांवर सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाल्याने शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.

 

उत्सवाच्या सुरुवातीला डीजेच्या मुद्द्यावर काही गणेश मंडळांकडून प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले. मात्र, उच्च न्यायालयाचे निर्देश, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि प्रशासनाची स्पष्ट भूमिका लक्षात घेऊन अखेर मंडळांनी डीजेचा आग्रह बाजूला ठेवला. शांतता समितीच्या बैठका, पोलिसांचे आवाहन आणि प्रशासनाच्या समन्वयातून विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यावर एकमत झाले.

 

डीजेऐवजी ढोल-ताशांचा निनाद

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी यंदा शहरातील रस्त्यावर, तरुणाई ढोल-ताशांच्या गजरावर थिरकली. लेझिम पथकांच्या आकर्षक सादरीकरणाने तरुणाईसह महिला, लहान मुले आणि अबालवृद्धांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध भजनी मंडळांनी सादर केलेल्या भक्तिगीतांमुळे मिरवणुकीला धार्मिक आणि भावनिक रंग प्राप्त झाला. त्यामुळे आवाजाचा अतिरेक टाळत उत्साह, श्रद्धा आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर मिलाफ यंदाच्या विसर्जनात पाहायला मिळाला.

 

प्रमुख मार्गांवरून निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. अखेर पैनगंगा नदीच्या पात्रात विधिवत विसर्जन करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. या विसर्जन मिरवणूकित, राजकीय मंडळींनीही हजेरी लावली. विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, काँग्रेसचे नेते नंदकिशोर अग्रवाल, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आदि नेत्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

 

पोलिसांचा चोख बंदोबस्त !

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले होते. शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील मार्ग तसेच विसर्जन स्थळांवर पोलिसांची विशेष नजर ठेवण्यात आली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. त्यामुळे संपूर्ण मिरवणूक शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली.

 

या बंदोबस्तात पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक थोरात, एसडीपीओ गौरव कायंदे-पाटील, ठाणेदार शंकर पांचाळ, सपोनि अमोल गुंडे, व्यंकट गंगलवाड, लक्ष्मी मलकुवार, फौजदार शरद लोहकर, अमोल राठोड, सागर इंगळे, गणेश मुंडे, अमर खिल्लारे यांच्यासह एलसीबी, गुप्तहेर विभाग आणि विविध पोलिस पथकांचा सहभाग होता.

 

प्रशासनाच्या निर्देशांना सहकार्य करत डीजेला पर्याय म्हणून पारंपरिक वाद्यांना दिलेले प्राधान्य आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी उमरखेडकरांनी दाखवलेला संयम यामुळे यंदाचा विसर्जन सोहळा विशेष ठरला.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.