Front • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

उमरखेडकरांना दिलासा: नगरपरिषदेकडुन शहरात ४ टँकरने पाणीपुरवठा सुरूच, ईसापुर धरणातील पाणी बंधाऱ्यात दाखल, येत्या एक-दोन दिवसांत नळयोजना पूर्ववत होणार !

भारती महाराज | महासूत्र न्यूज

उमरखेड : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर,  नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उमरखेड नगरपरिषदेकडून, काही दिवसापासून ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. या चारही टँकरद्वारे, शहरातील प्रत्येक प्रभागात पाणी पोहोचविण्याचे मोठे काम नगरपरिषदेकडून सुरू आहे. दरम्यान  उमरखेडकरांसाठी दिलासादायक  बाब म्हणजे, दरवर्षीचा पाणी मागणीचा शेड्युल बाजूला ठेवत, टंचाईची शक्यता ओळखून, नगरपरिषदेकडून  ५ ऑक्टोबरला पाणी सोडण्याची मागणी, उर्ध्व पैनगंगा विभागाकडे करण्यात आली होती. पाणी लवकरात लवकर सोडण्यासाठी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करावा लागला. दरम्यान  24 ऑक्टोबरला इसापूर धरणातून सोडलेले पाणी आता, दहागाव बंधाऱ्यात पोहोचण्यास सुरुवात झाली असून, येत्या एक-दोन दिवसांत शहराचा नियमित पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

 

दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठ्याला विलंब !

शहरातील पाणीसाठा संपल्याने तात्पुरती पाणीटंचाई निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन उमरखेड नगरपरिषदेने ५ ऑक्टोबर रोजीच उर्ध्व पैनगंगा विभागाकडे पाण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित विभागाकडून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी सोडण्यास विलंब झाला. परिणामी, शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

 

या काळात नागरिकांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली. गेल्या काही दिवसांपासून, शहरातील सर्व प्रभागांमध्ये चार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच उपलब्धतेनुसार काही भागांत नदीतील पाणी नळांद्वारे सोडून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

पाणी बंधाऱ्यात, यंत्रणा सज्ज !

उर्ध्व पैनगंगा विभागाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी २६ ऑक्टोबरपर्यंत दहागाव बंधाऱ्यात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा जमा होताच शहरातील नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याच्या आशा बळावल्या आहेत.

 

“पाणी उपसा आणि शुद्धीकरण केंद्राची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती ठाकरे यांनी दिली.”

 

मुख्याधिकारी म्हणतात,नळयोजना लवकरच सुरू होणार !

“दहागाव बंधाऱ्यात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बंधाऱ्यात पुरेसा साठा उपलब्ध होताच शहरातील नियमित नळयोजना पूर्ववत कार्यान्वित केली जाईल. त्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी दिली.”

 

नगराध्यक्षांचे नागरिकांना आवाहन !

“साधारणपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये पाण्याची मागणी केली जाते. मात्र, संभाव्य टंचाई लक्षात घेऊन यंदा ५ ऑक्टोबरलाच उर्ध्व पैनगंगा विभागाकडे पाण्याची मागणी करण्यात आली होती. दुरुस्तीच्या कामामुळे पाणी सोडण्यास विलंब झाला. आता २४ ऑक्टोबरला सोडलेले पाणी बंधाऱ्यात पोहोचत आहे. येत्या एक-दोन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून नगरपरिषदेला सहकार्य करावे,” असे आवाहन नगराध्यक्षा तेजश्री संतोष जैन यांनी केले.

 

“पाणीटंचाईच्या काळात चार टँकरच्या माध्यमातून सुरू असलेला पुरवठा नागरिकांसाठी तात्पुरता आधार ठरला आहे. आता बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा जमा होऊन नळांना नियमित पाणी कधी येते, याकडे उमरखेडकरांचे लक्ष लागले आहे.”

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.