भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहचला असून २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, ‘मेस्टा’ (MESTA) संघटनेने ऐनवेळी यु-टर्न घेत भाजप नेत्याच्या भगिनी डॉ संगीता शिंदे-बोंडे यांना अचानक पाठिंबा दिल्याची चर्चा उडाली आहे. त्यामुळे आधीच खळबळ उडालेली असताना, या मतदारसंघातील अधिकृत पक्षांची उमेदवारी आणि अंतर्गत बंडखोरीमुळे निवडणुकीचे गणित अत्यंत गुंतागुंतीचे आणि रंजक बनले आहे. या निवडणुकीत नेमके किती प्रमुख चेहरे, बंडखोर अपक्ष रिंगणात आहेत. अन् कोण कोणाचे पत्ते कट करणार, याचा हा ‘महासूत्र’ विशेष ग्राउंड रिपोर्ट.
एकूण किती उमेदवार रिंगणात
या निवडणुकीत सुरुवातीला अनेक अर्ज दाखल झाले असले तरी, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर आता मुख्य लढत २६ उमेदवारांमध्ये होत आहे. या २६ उमेदवारांपैकी ५ ते ६ प्रमुख चेहरे असून, उर्वरित अपक्षांमुळे मतांचे मोठे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती, महाविकास आघाडी आणि बंडखोरांची ‘कुंडली’
या निवडणुकीत दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाडी आणि बंडखोरी पाहायला मिळत आहे.
महायुती (शिवसेना – शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी – अजित पवार गट)
महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण रामराव सरनाईक (शिवसेना – शिंदे गट) आहेत.
आमदार सरनाईक यांनी २०२० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती . मात्र यावेळी आपला निभाव लागणार की नाही याचं चिंतेत त्यांनी ६ महिन्यांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश करीत, उमेदवारी मिळवली आहे. त्यांना महायुतीने अधिकृत उमेदवारी दिली आहे.
भाजपचे बंडखोर (अपक्ष)
महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला सुटल्यामुळे भाजपमधील इच्छुकांमध्ये तीव्र असंतोष पसरला. पक्षाचा आदेश डावलून निवडणूक लढवणाऱ्या ३ प्रमुख नेत्यांची भाजपने ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. हे बंडखोर खालीलप्रमाणे आहेत:
१) डॉ. संगीता शिंदे-बोंडे (भाजप नेत्याच्या भगिनी, ज्यांना मेस्टा संघटनेने ऐनवेळी पाठिंबा जाहीर केला आहे)
२) प्रा. चंद्रशेखर (शेखर) भोयर (भाजपचे बंडखोर)
अमरावती जिल्ह्यातील भाजपचे वजनदार नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य. शिक्षक मतदारांवर आणि शैक्षणिक संस्थांवर त्यांची चांगली पकड मानली जाते. तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्याविरुद्ध अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
३) सुमित पवार (भाजपचे युवा बंडखोर)
भाजपच्या युवा आघाडीत सक्रिय असलेले आणि उच्चशिक्षित तरुण चेहरा. त्यांनीही पक्षाचा आदेश डावलून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, ज्यामुळे त्यांच्यावरही ६ वर्षांच्या निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.
महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना – ठाकरे गट, राष्ट्रवादी – शरद पवार गट)
मविआमध्ये देखील एकजूट राखण्यात अपयश आले असून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये थेट फ्रेंडली फाईट पाहायला मिळत आहे.
काँग्रेस अधिकृत उमेदवार आदिती पोहरे
•काँग्रेस कडून अधिकृत उमेदवार म्हणून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. अदिती ह्या देशोन्नतीचे मालक प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत. तर माजी मंत्री देशमुखांच्या त्या कन्या आहेत.
शिवसेना – ठाकरे गटाचे अधिकृत दत्तात्रय लहाने
• शिवसेना – ठाकरे गट यांनी आपला अधिकृत उमेदवार म्हणून दत्तात्रय लहाने यांना उतरवले आहे. मात्र दोन्ही पक्ष आमनेसामने आल्यामुळे महाविकास आघाडीच्या हक्काच्या शिक्षक मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रबळ अपक्ष उमेदवार
• श्रीकांत देशपांडे
जे अपक्ष उमेदवार असून माजी आमदार आहेत. ज्यांचे शिक्षकांमध्ये स्वतःचे मोठे वलय आहे आणि ते महायुती-मविआ समोरील मोठे आव्हान मानले जात आहेत. यासह इतरही अपक्ष उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे. आपापल्या पद्धतीने प्रचार करीत आहेत.
‘मेस्टा’च्या कोलांटउडीनंतर समीकरणात बदलाची शक्यता
मेस्टा या इंग्रजी शाळांच्या मोठ्या संघटनेने महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक किंवा मविआच्या उमेदवार अदिती पोहरे यांच्या ऐवजी, भाजपच्या बंडखोर उमेदवार डॉ संगीता शिंदे-बोंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केल्याची चर्चा आहे. मतदानाला अवघे ५ दिवस शिल्लक असताना संघटनेच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या अडचणी वाढल्या असून, बंडखोरांचे पारडे जड होताना दिसत आहे.
शिवाजी शिक्षण संस्थेची भूमिका महत्त्वाची
अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत जवळपास चार जिल्ह्यात आपले प्रभुत्व असलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था यांचीही भूमिका ही महत्त्वाची मानली जात आहे. या संस्थेतील मतदारांचा निर्णय, अमरावती शिक्षक मतदार संघाच्या आमदार निवडीवर, मोठा प्रभाव पाडू शकतो असेही बोलले जात आहे.
अमरावतीच्या या रणसंग्रामात आता ‘अधिकृत विरुद्ध बंडखोर’ आणि ‘काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट’ असा अभूतपूर्व सामना रंगणार आहे. मतांचे हे बहुकोणीय विभाजन विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना तारणार की बंडखोर मुसंडी मारणार, की मग नव्या उमेदवारास मतदार पसंती देणार. याचा फैसला मात्र २७ ऑक्टोबरला निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.












Add Comment