स्थानिक पोलिसांना कानोकान खबर न लागू देता कारवाई ; रोख रकमेसह चारचाकी, दुचाकी आणि मोबाईल जप्त
भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : ढाणकीतील ढाणकी–गांजेगाव रस्त्यावरील एका शेतातील शेडमध्ये सुरू असलेल्या शाही जुगार अड्ड्यावर, उमरखेडच्या पोलीस उपविभागीय कार्यालयाने, नव्याने रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक आयपीएस गौरव कायंदे पाटील यांच्या नेतृत्वात धडक कारवाई केली. यात शेतमालक व जुगार अड्डा चालकासह १४ जण जुगारी पोलिसांचे तावडीत सापडले आहेत. १९ ऑक्टोबरच्या संध्याकाळच्या सुमारास, गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत, रोख रकमेसह दुचाकी वाहने आणि मोबाईल असा एकूण १८ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यवाहीमुळे मात्र, ढाणकीपरिसरात आणि उमरखेड तालुक्यासह पोलीस वर्तुळातही चांगलीच खळबळ उडाली असून, अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दनाणल्याचे बोलले जात आहे .
या कारवाईतील विशेष बाब म्हणजे स्थानिक पोलिसांना याची कान कुणही लागू न देता, या कार्यवाही पासून दूर ठेवत ही मोहीम राबविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. आता या जुगार अड्याला नेमके कोणाचे छुपे समर्थन होते, हे चौकशीतून समोर येईल काय, हे बघणे मात्र गंमतशीर ठरणार आहे .
वरिष्ठ कार्यालयाकडून करण्यात आलेल्या छापा कार्यवाहीत शेतमालकासह जुगार अड्डा चालक व खेळणारे जुगारी असे एकूण १४ जण पोलिसांच्या टप्प्यात सापडले आहेत. ढाणकीपासून जवळच असलेल्या ढाणकी–गांजेगाव रस्त्यावरील एका शेतातील शेडमध्ये शाही जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती, वरिष्ठ पोलिस कार्यालयाला मिळाली. माहितीचे अवलोकन करून, छापा कार्यवाहीसाठी गुप्त ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला.
ढाणकी–गांजेगाव रस्त्यावर असलेल्या संबंधित शेतामध्ये, अप्पर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील, यांच्यासह पथक घटनास्थळावर दाखल झाले. कार्यवाही इतक्या ताबडतोब करण्यात आली, खेळण्यात गुंग असलेल्या जुगाऱ्यांना, पथकाने, काही क्षणात चोहूबाजूने घेरत जुगार अड्ड्यावर ताबा मिळवला.
या कारवाईदरम्यान जुगार खेळत असलेल्या १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून रोख रक्कम, वाहने आणि मोबाईल असा मोठा मुद्देमाल जप्त करणे सुरू असून, वृत्त लिहीपर्यंत पोलिसांकडून उशिरा रात्रीपर्यंत पंचनामा अद्याप सुरूच होता.
तब्बल १८.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त !
पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. यात रोख रक्कम तब्बल २ लाख २७ हजार रुपये ताब्यात घेतले. घटनास्थळावरून जवळपास १३ लाख ९५ हजार रुपये किमतीची २२ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
जुगारांकडून हस्तगत करण्यात आलेली, अंदाजे २ लाख २४ हजार ५०० रुपये किमतीची 16 मोबाईल जप्त करण्यात आले. त्याशिवाय दोन कुलर व ५२ पत्त्याचे ३० पॉकेट असे जवळपास, 13 हजार रुपयांचा मुद्देमालासह, एकूण १८ लाख ५९ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल, पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक पोलिसांना खबर नव्हती?
या कारवाईतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता छापा टाकण्यात आल्याने, पोलीस वर्तुळात मोठी चर्चा उमटली आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असताना, अशा कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाला पुढाकार घ्यावा लागल्याने, अनेक वजनदार प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या १४ जणांवर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत तपशील समोर आल्यानंतर प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
सदर जुगार अड्ड्यावर करण्यात आलेल्या छापा कार्यवाही, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक तथा उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे, अनिल पवार, प्रमोद टिमके, सुनिल काळुसे, परमेश्वर मुंडे, दादाराव मिरासे, इंदल आडे, चेतन आडे, गोविंद जायभाये, गोविंद कवटीकवार, गणेश पंधरवाडे, मारोती धुळगंडे, सौरव जामकर, श्रावण मोकाडे, वैभव धाडवे यांनी पार पाडली आहे.












Add Comment