Forest crime • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • महागाव • यवतमाळ जिल्हा

फक्त ४ हजारांची लाच स्वीकारतांना कंत्राटी ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात, वन मजुरासह वनपालही अडकले!

भारती महाराज महासूत्र न्यूज 

यवतमाळ : वडिलोपार्जित घर पाडल्यानंतर निघालेले जुने सागवान लाकूड, उमरखेड येथे नेण्यासाठी वाहतूक परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात, फक्त ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना, महागाव वनपरिक्षेत्र कार्यालयातील कंत्राटी संगणक ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी महागाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात करण्यात आली.

 

विनोद शंकरराव सोळुंके (३८) रा टेंभी, ता महागाव असे ताब्यात घेतलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात वनपाल आनंद हरिश्चंद्र बोरेकर (३८) आणि वनमजूर जयवंत सदू ढगे (५५) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

 

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलोपार्जित घराच्या पाडकामातून निघालेले जुने सागवान लाकूड, नवीन लाकडात रूपांतरित करण्यासाठी उमरखेड येथे वाहतूक करायचे होते. त्यासाठी वनविभागाकडून वाहतूक परवानगी पास आवश्यक होता. याकरिता ७०० रुपये शासकीय चलन भरावे लागेल, तसेच त्याव्यतिरिक्त ४ हजार रुपये वेगळे द्यावे लागतील, अशी मागणी कंत्राटी ऑपरेटरकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. पूर्ण रक्कम न दिल्यास काम होणार नसल्याचेही सांगण्यात आल्याचे एसीबीच्या तक्रारीत नमूद आहे.

 

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला.

 

सायंकाळी सुमारे ४.३३ ते ४.४९ वाजेदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील संगणक कक्षात, तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोळुंके याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या टेबलवर ठेवलेली लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली.

 

या प्रकरणात महागाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७, ७(अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले आहे. संबंधितांच्या निवासस्थानी घरझडतीची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक स्वप्निल निराळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक अभय अष्टेकर यांनी काम पाहिले.

 

दरम्यान, सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.