उमरखेड ताज्या घडामोडी महत्वाची बातमी यवतमाळ जिल्हा

हिरवाईने नटलेल्या परजना-ब्राम्हणगावच्या माळटेकडीवर प्राचीन शिव-पार्वती मंदिर ठरते श्रावणातील श्रद्धा व निसर्गाचे अनोखे संगमस्थळ!

भारती महाराज महासूत्र न्यूज 

उमरखेड : तालुक्यातील ब्राम्हणगाव-परजना सीमेवरील, माळटेकडीवर निसर्गाच्या कुशीत विराजमान असलेली भगवान शिव-पार्वतींचे प्राचीन मंदिर, सध्या श्रावण महिन्यात भाविकांचे आकर्षण ठरत आहे. हिरव्यागार वनराईने नटलेल्या या परिसरातील प्रसन्न आणि आल्हाददायी वातावरणाचा अनुभव घेत, दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल होत आहेत.

 

माळटेकडीच्या पायथ्याशी ब्राम्हणगाव हद्दीत असलेल्या मंदिरात, शिव-पार्वतीच्या रेखीव प्राचीन दगडी मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या पुढे पायऱ्या चढून टेकडीवर गेल्यानंतर परजना हद्दीतही शिव-पार्वतीच्या सुडौल व आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेतात. या दोन्ही मूर्ती पुरातन काळापासून येथे विराजमान असल्याचे सांगितले जाते.

 

या परिसराला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वही लाभले आहे. बेलमंडळ येथील शिवोपासक संत भुजंगाप्पा महाराज यांची समाधी येथे आहे. तसेच ब्राम्हणगावचे दानशूर महापुरुष श्री. तेजमल गांधी यांचीही समाधी याच परिसरात आहे.

 

विशेष म्हणजे, कार्बन क्रेडिट बँकेचे संस्थापक व कृषी शास्त्रज्ञ डॉ विजयराव माने यांनी ही  टेकडी फुलवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. ईथे शिताफळ, वड, पिंपळ, बेल, कडुनिंब आदी प्रकारचे, शेकडो झाडांची लागवड केली आहे. गर्द हिरवाईने, व्यापलेली ही माळटेकडी, श्रावणात अधिकच खुलून दिसते. निसर्गरम्य वातावरण, शांतता आणि शिव-पार्वतीचे दर्शन यामुळे भाविकांना येथे एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो.

 

ब्राम्हणगाव आणि परजना येथील दोन्ही मंदिर परिसरात बैलपोळ्याचाही उत्सव भरतो. त्यामुळे धार्मिक श्रद्धेसोबतच पारंपरिक संस्कृतीचे दर्शनही या परिसरात घडते.

 

विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या निसर्गरम्य शिवमंदिर परिसराचा, विकास झाल्यास हे ठिकाण धार्मिक पर्यटनाचे आकर्षण ठरू शकते. सध्या मात्र श्रावण महिन्यात माळटेकडीवर उमटणारी, भाविकांची पावले आणि निसर्गाच्या सान्निध्यात घुमणारा ‘हर हर महादेव’चा जयघोष, परिसराला भक्तिमय करून टाकत आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.