भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : तालुक्यातील मौजा खरबी येथील कास्तकारांनी घरगुती कच्च्या वाटणीपत्राच्या आधारे स्वतंत्र फेरफार नोंद करून स्वतंत्र सातबारा उतारे तयार करून देण्याच्या मागणी केली आहे. यात टाळाटाळ केल्यास, प्रशासनाविरोधात १३ ऑगस्टपासून, उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर, आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत कास्तकारांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना, ६ ऑगस्टला निवेदन देऊन लेखी हमीची मागणी केली आहे.
विलास साहेबराव अंभोरे व इतर रा खरबी असे निवेदन देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. खरबीतील अनेक कास्तकारांनी सन २०२४ पासून तहसीलदार, उमरखेड यांच्याकडे घरगुती लिखित वाटणीपत्रानुसार फेरफार घेऊन स्वतंत्र सातबारा, करण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्षात वाटणीपत्रानुसार संबंधित कास्तकारांचे स्वतंत्र वहिती व ताबे असून, वाटणीधारकांचीही एकमेकांना संमती असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ रोजी खरबी ग्रामपंचायत कार्यालयात कास्तकारांनी आमरण उपोषण केले होते. अतिवृष्टीमुळे प्रशासनाने त्यावेळी उपोषण सोडवून घेतले होते. मात्र, त्यानंतर दिलेले आश्वासन पूर्ण झाले नसल्याचे कास्तकारांचे म्हणणे आहे.
वाटणीपत्रावरून फेरफार करून स्वतंत्र सातबारा उतारे तयार करण्याबाबत प्रशासनाने लेखी हमी द्यावी, अशी मागणी कास्तकारांनी केली आहे. लेखी आश्वासन देण्यास विलंब झाल्यास प्रशासनाला समस्या सोडविण्याची इच्छा नाही, असे गृहीत धरून १३ ऑगस्ट २०२६, गुरुवारपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरखेडसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या आमरण उपोषणाला खरबी येथील विलास साहेबराव अंभोरे, गणपत माणिकराव बोंबले, लक्ष्मण दादाराव हराळ, बालाजी उद्धव राजन, संजय नारायण ढोले आणि मारोती सिताराम वाळके हे बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .
कधी कधी आणि कोणाला दिले निवेदने
या मागणीसाठी २१ सप्टेंबर २०२४, ८ जानेवारी २०२५, ८ एप्रिल २०२५, २२ जुलै २०२५, ८ ऑगस्ट २०२५, १८ सप्टेंबर २०२५ आणि ६ ऑगस्ट २०२६ रोजी तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे ७ व २७ एप्रिल २०२६ रोजी, तर विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे २७ एप्रिल २०२६ रोजी निवेदन देण्यात आले. मात्र, अद्याप मागणीची ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.











Add Comment