यवतमाळ : महागाव तालुक्यातील एका अंगणवाडीच्या मदतनीस पदावर नियुक्ती करून देण्यासाठी, तब्बल १० हजार रुपयांचा रेट ठरला. महागाव येथील महिला व बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिका तथा अतिरिक्त कार्यभार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी, लाच मागितल्याची तक्रार एसीबीला प्राप्त झाली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) यवतमाळ पथकाने, बुधवारी २२ जुलैला सायंकाळी सापळा रचला. अँडव्हान्स म्हणून तब्बल ५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना, आरोपीस त्यांच्या स्वयंपाक घरातून, रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे मात्र सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
शकुंतला जयवंत इंगोले (५७) महागाव असे एसीबीने कार्यवाही केलेल्या प्रभारी सीडीपीओंचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका २१ वर्षीय महिला तक्रारदाराने, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला होता. या पदावर निवड करून देण्यासाठी आरोपी अधिकारी इंगोले यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबीने सदर तक्रारीच्या पडताळणीत, आरोपीने अँडव्हान्स म्हणून ५ हजार रुपये आणि काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५ हजार रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाले. लागलीच एसीबीने सापळा कार्यवाही आखली.
आरोपीला कानोकान खबर न होऊ देता, एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराला पंचांसमक्ष महागाव येथील आरोपीच्या राहत्या घरी पाठविण्यात आले. आरोपींनी स्वतःच्या स्वयंपाकघरात, काम करून देण्यासाठी अँडव्हान्स म्हणून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने, क्षणाचाही विलंब न करता त्यांना रंगेहात पकडले, अन् खेळ संपला. त्यानंतर स्वयंपाकघरातील गॅस ओट्याखालील कप्प्यात ठेवलेली लाचेची रक्कम एसीबीने जप्त केली. कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने इंगोले यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेत, विविध कागदपत्रांची तपासणी सुरू केली. या संपूर्ण कारवाईची व्हिडिओग्राफी करण्यात आली असून पंचनामा देखील करण्यात आल्याची माहिती, एसीबीने दिली आहे.
या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारित) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. या कार्यवाईमुळे मात्र, महागाव सारख्या ग्रामीण भागातील, इतर शासकीय विभागात, भीतीचे वातावरण बघायला मिळाले तर दुसरी कडे, अधिकारी व कर्मचारी आता चांगलेच अलर्ट झाल्याचे बोलल्या जात आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे (एसीबी) पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पो. हवा. अतुल मत्ते, अब्दुल वसीम, सुधिर कांबळे, पो.शि. आकाश सहारे, सुरज मेश्राम, सतिश सोनोने, इफाजोद्दीन काझी, मपोशी मनिषा राजुरकर, सरिता राठोड, चालक दिनेश सरोदे, अतुल नागमोते यांनी यशस्वी पार पाडली आहे.












Add Comment