भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : उमरखेड शहरातील पुसद हरदडा राज्य मार्गावर, 26 सप्टेंबरला ढाणकी रोड परिसरात शक्तिशाली जिलेटिन स्फोट झाला, यात चौघांचा मृत्यू झाला होता . यातील गंभीर जखमी ट्रॅक्टर मालकावर नांदेड येथे उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी शस्त्रक्रिये दरम्यानच, ट्रॅक्टर मालक अप्पाराव बोक्से यांचाही मृत्यू झाल्याने, आतापर्यंत ५ जणांचा ‘बळी’ गेला आहे.
मात्र एकाच कुटुंबातील,घटनेच्या दिवशी मुलाचा तर ५ दिवसांनी उपचारादरम्यान बापाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने, उमरखेडमध्ये खळबळ उडाली असून, बाळदी गावावर पुन्हा एकदा शोक कळा पसरली आहे. दरम्यान स्फोटक पुरवठादार आरोपी बळीराम नरवाडे याची, १ ऑक्टोबर पर्यंतची कोठडी संपून, न्यायालयाने जेलमध्ये रवानगी केली आहे.
अप्पाराव माधव बोक्से (५५ ) रा बाळदी असे, गुरुवारी नांदेड येथे शस्त्रक्रिये दरम्यान, मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे. यापूर्वी स्फोट झालेल्या जागीच दोघांचा, तर उपचारादरम्यान दोघांचा असा, ट्रॅक्टर मालकाच्या मुलासह चौघांचा मृत्यू झाला होता, या प्रकरणात मृतांची संख्या, आता ५ वर पोहोचली आहे. तर एकट्या बाळदी गावातील मृतांची संख्या तीनवर पोहचली आहे.
ढाणकी रस्त्यावरील कीसान वेल्डिंग वर्कशॉप येथे, झालेल्या शक्तिशाली जिलेटिन स्फोटानंतर, जिल्हाभरातील यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती . पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या तपासातून, जिलेटिन स्पोटकाची अवैध वाहतूक झाल्याचे उघड झाल्यावर, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यात बाळदी येथील अप्पाराव बोक्से, वैभव बोक्से तर ढाणकी येथील स्फोटक पुरवठादार बळीराम नरवाडे, या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात आरोपी चालक वैभवचा घटनेच्या दिवशी उपचारादरम्यान, तर गुरुवारी दुपारी आरोपी ट्रॅक्टर मालक अप्पाराव बोक्से यांचाही, ऑपरेशन दरम्यान मृत्यू झाल्याने, पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
स्फोटक पुरवठादाराची जेल रवानगी!
दरम्यान या प्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या, स्फोटक पुरवठादार बळीराम नरवाडे यास न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी सुनावली होती. कोठडी संपताच पोलिसांनी १ ऑक्टोबरला न्यायालयात आरोपीला हजर केले होते. न्यायालयाने त्याची जेलमध्ये रवानगी केली आहे. अशी माहिती, या प्रकरणातील तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक, तथा उमरखेड एसडीपीओ गौरव कायंदे पाटील यांनी दिली आहे.












Add Comment