भारती महाराज महासूत्र न्यूज
यवतमाळ : एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजाची लावगड केली असल्याची गुप्त माहिती, गुन्हेशाखेला मिळाली.दरम्यान पोलिसांनी धाड टाकून गांजाची अवैध लागवड उघडकीस आणली आहे. या कारवाईत तब्बल २४,००० रुपये किमतीची, गांजाची २२ झाडे जप्त करण्यात आली असून, ३५ वर्षीय आरोपी शेतकऱ्याला एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. ही कार्यवाही २४ सप्टेंबरला गुन्हे शाखेच्या पुसद पथकाकडून करण्यात आली आहे.
संतोष किसन लोहटे (वय ३५ वर्षे) रा जणुना ता पुसद जि यवतमाळ असे कारवाई करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद भागात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, जणुना येथील रहिवासी शेतकरी संतोष लोहटे याने आपल्या शेतात गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
माहिती मिळताच पथकाने जणुना शेतशिवारात पंचांसमक्ष छापा टाकला. या छाप्यादरम्यान आरोपी संतोष लोहटे याच्या ताब्यात असलेल्या शेतात गांजाची एकूण २२ झाडे आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अंमली औषधी व प्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ च्या कलम ८(क) आणि २०(a), (i) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक सतीश चवरे, सपोनि धिरज बांडे, पोउपनि अमोल राठोड, सफौ संतोष भोरगे, पोहवा सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीराम आणि चापोशि राजेश जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पोलिसांचे जनतेला आवाहन:
“यवतमाळ जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे, शस्त्र बाळगणे किंवा अंमली पदार्थांची तस्करी होत असल्यास, जनतेने कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.”– सतीश चवरे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ)












Add Comment